राष्ट्रवादी सांगली महापौरपदासाठी आग्रही; कॉंग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष

बलराज पवार
Sunday, 14 February 2021

सांगली महापौरपदासाठी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनीही आग्रह धरला.

सांगली : महापौरपदासाठी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांनीही आग्रह धरला. विरोधी कॉंग्रेसने या पदावर आधीच दावा सांगितला आहे. "राष्ट्रवादी'चे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी महापौरपदासाठी गटनेते मैनुद्दीन बागवान, दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक विष्णू माने हे इच्छुक आहेत. मात्र, याबाबत अंतिम निर्णय पालकमंत्री जयंत पाटील घेतील. तसेच, सहकारी पक्ष कॉंग्रेसच्या निर्णयाचीही आम्हाला प्रतीक्षा आहे, असे आज सांगितले.

महापौरपदासाठी 23 ला निवडणूक होणार आहे. त्यासाठी गुरुवारी (ता. 18) अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. या पार्श्वभूमीवर आज "राष्ट्रवादी'चे शहर जिल्हाध्यक्ष बजाज यांच्या उपस्थितीत "राष्ट्रवादी'च्या नगरसेवकांची बैठक सर्किट हाउस येथे झाली. या वेळी राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पवार, महापालिकेतील गटनेते मैनुद्दीन बागवान, दिग्विजय सूर्यवंशी, विष्णू माने, शेडजी मोहिते, मनगू सरगर यांच्यासह सर्व नगरसेवक व एक स्वीकृत नगरसेवक उपस्थित होते. 

महापालिकेत कॉंग्रेसचे संख्याबळ 19 व "राष्ट्रवादी'चे 15 आहे. दोन्ही पक्षांचे एकूण सदस्य 34 आहेत; तर सत्ताधारी भाजपकडे 41 सदस्य व दोन सहयोगी सदस्य आहेत. बहुमतासाठी 39 सदस्यांची गरज आहे. त्यासाठी फोडाफोडीच्या राजकारणातून चमत्कार घडेल, या आशेने कॉंग्रेस व "राष्ट्रवादी'ची मोट बांधून महापौरपदाची निवडणूक लढवण्याची हालचाल सुरू आहे.

या पार्श्‍वभूमीवर काल (ता. 12) बैठक झाली. यात संजय बजाज यांनी इच्छुकांची मते आजमावून घेतली. यात "राष्ट्रवादी'कडून महापौरपदासाठी आग्रह धरण्यात आला. दरम्यान, महापौरपद खुले असल्याने खुल्या प्रवर्गातील नगरसेवकास महापौरपदाची संधी मिळावी, अशी मागणी सूर्यवंशी यांनी केली; तर ज्यांना संधी मिळाली नाही त्यांचा प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी विष्णू माने यांनी केली. 
 

कॉंग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
दरम्यान, कॉंग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर तसेच नगरसेवक मंगेश चव्हाण हे कॉंग्रेसकडून महापौरपदासाठी इच्छुक आहेत. याबाबत कॉंग्रेसचे नेते राज्यमंत्री विश्वजित कदम, जयश्री पाटील हे कोणता निर्णय घेतात? विशाल पाटील गटाची भूमिका काय राहणार? याकडे लक्ष लागले आहे.

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP insists on Sangli mayoral post; Attention to the role of Congress