राष्ट्रवादीला मोठा धक्का; 'राजे' करणार शिवसेनेत प्रवेश?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

आज दिवसभर माध्यमांमध्ये एकच चर्चा असून राजे शिवसेनेत प्रवेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी रामराजे नाईक निंबाळकरांकडून यावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रीया आलेली नाही.

सातारा: साताऱ्यात रामराजे आणि उदयनराजे यांचा गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. दोन्ही राजेंनी एकमेकांवर अत्यंत टोकदार शब्दांत टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मात्र या संघर्षानं टोक गाठल्याचं दिसत आहे. याच संघर्षामुळे रामराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रवादीला निर्वाणीचा इशारा दिला असल्याची माहिती आहे. तसंच आगामी काळात रामराजे शिवसेनेचं शिवबंधन बांधण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. 

आज दिवसभर माध्यमांमध्ये एकच चर्चा असून राजे शिवसेनेत प्रवेश करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी रामराजे नाईक निंबाळकरांकडून यावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रीया आलेली नाही.

पश्चिम महाराष्ट्रातील वजनदार नेते अशी ओळख असलेले रामराजे नाईक निंबाळकर हेदेखील राष्ट्रवादीत नाराज असल्याचं दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला मानहाणीकारक पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता आघाडीचे काही नेते सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतून उदयनराजे रागाने बाहेर पडले. नीरा नदीच्या पाण्यावरून उदयनराजे आणि रामराजेंमधील वादानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या उदयनराजेंनी चर्चेतून बाहेर पडत शरद पवारांचा निर्णय कोणताही असेल तो मला मान्य असल्याचं सांगितलं. तसंच आधी पिसाळलेल्यांनी आवरा असेही रामराजेंचे नाव घेता उदयनराजे म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader ramraje naik nimbalkar may be join shivsena