"राष्ट्रवादी'चे नेते विठ्ठल लंघे भाजपच्या व्यासपीठावर

सुनील गर्जे
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

नेवासे : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आलेले पक्षाचे नेते विठ्ठल लंघे आज भाजपच्या व्यासपीठावर उपस्थित झाले आहेत. त्यांचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्वागत केले. गडाख व घुले यांच्यातील मनोमीलनाचा वचपा काढण्यासाठी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केलेली खेळी यशस्वी झाल्याचे मानले जाते.

नेवासे : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आलेले पक्षाचे नेते विठ्ठल लंघे आज भाजपच्या व्यासपीठावर उपस्थित झाले आहेत. त्यांचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी स्वागत केले. गडाख व घुले यांच्यातील मनोमीलनाचा वचपा काढण्यासाठी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केलेली खेळी यशस्वी झाल्याचे मानले जाते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लंघे यांना मतदारसंघात कामाला लागण्याचे संकेत देण्यात आले होते. त्यामुळे मतदारसंघात मुरकुटे-गडाख-लंघे अशी प्रमुख तिरंगी लढत होणार असल्याची चर्चा होती. मात्र, वरिष्ठ पातळीवर अचानक राजकीय समीकरणे वेगाने बदलली. त्यात राष्ट्रवादीने नेवासे मतदारसंघात उमेदवारच दिला नाही. पक्षातर्फे "क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यातून लंघे यांना विश्‍वासात घेतले नसल्याची चर्चा होती. पक्षाच्या या धोरणामुळे लंघे यांचा हिरमोड झाल्याचेही सांगितले जात होते.

राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार नरेंद्र व चंद्रशेखर घुले न्याय देतील, अशी लंघे यांना अपेक्षा होती. मात्र, घुले बंधुंनीही ऐन वेळी लंघे यांची साथ सोडल्याची चर्चा आहे. त्यामुळे लंघे सैरभैर बनल्याचे सांगण्यात येत होते. नुकत्याच झालेल्या गडाख-घुले यांच्या कुकाणे येथील मनोमीलन मेळाव्याप्रसंगी लंघे अस्वस्थ देहबोली लपवू शकले नव्हते.

त्यांच्यातील ही खदखद लवकरच बाहेर पडणार असल्याचा राजकीय जाणकारांना अंदाज होता. शुक्रवारी दुपारी नेवासे फाटा येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेतच लंघे भाजपत प्रवेश करतील, असे सांगण्यात येत होते. तथापि, तो महूर्त हुकला. त्यामुळे मुरकुटे यांनी आज ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा उरकून घेतल्याचे बोलले जाते.

लंघे यांच्यासह त्यांचे समर्थक प्रदीप ढोकणे, राजेंद्र मते, भाऊसाहेब पटारे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे यांनीही भाजपच्या व्यासपीठावर हजेरी लावली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Vitthal Langhe present in BJP meeting