दिलीप सोपल 'घड्याळ' काढून 'शिवबंधन' बांधणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

दिलीप सोपल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत बोलाविलेल्या बैठकीला दांडी मारली होती. त्यांनी भविष्यातील रणनितीविषयी बार्शीत कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेतला होती. या मेळाव्यात त्यांचा शिवसेना प्रवेश ठरला होता.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार व शरद पवार यांचे विश्‍वासू सहकारी अशी ओळख असलेले दिलीप सोपल हे घड्याळ काढून शिवसेनेचे शिवबंधन बांधणार आहेत. येत्या 28 ऑगस्टला ते कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

दिलीप सोपल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत बोलाविलेल्या बैठकीला दांडी मारली होती. त्यांनी भविष्यातील रणनितीविषयी बार्शीत कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा घेतला होती. या मेळाव्यात त्यांचा शिवसेना प्रवेश ठरला होता. अखेर यावर आज (सोमवार) शिक्कामोर्तब झाले. बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे निर्णय घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

बार्शीचे शिवसेनेचे माजी आमदार राजा राऊत भाजपमध्ये गेल्याने सोपल शिवसेनेत जाण्याची शक्यता पूर्वीपासूनच होती. दिलीप सोपल हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने राष्ट्रवादीला हा मोठा धक्का आहे. तर दुसरीकडे सोपल यांच्या सेना प्रवेशाने भाजपचे नेते माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्यासाठी देखील हा मोठा धक्का असणार आहे. कारण शिवसेना - भाजप युतीच्या जागा वाटपात बार्शीची जागा ही सेनेकडे आहे. सध्या विद्यमान आमदार हे दिलीप सोपल असल्याने या ठिकाणी विधानसभेची जागा शिवसेनेलाच सुटणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही जागा भाजपला सुटेल, अशी आस लावून बसलेल्या राऊत यांच्या स्वप्नांना सोपल यांच्या सेनाप्रवेशामुळे सुरंग लागणार आहे. सोपल हे प्रत्येक विधानसभा निवडणुकीवेळी काहीतरी नवीन डाव टाकून निवडून येतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA Dilip Sopal enters Shivsena on 28 August