...तर ईव्हीएम तोडण्याचे प्रात्यक्षिक दाखवू : उदयनराजे

...तर ईव्हीएम तोडण्याचे प्रात्यक्षिक दाखवू : उदयनराजे

कोरेगाव : ‘‘शशिकांत शिंदे यांना मी आमदार करणारच. त्यांनी निवडणुकीच्या मैदानासाठी सज्ज राहावे. विरोधक व लोकसभा निवडणुकीत मला खिंडीत अडविणाऱ्यांचे काय करायचे, ते मी बघतोच,’’ अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिंदे यांना पाठबळ देत विरोधकांना आव्हान दिले. निवडणुकीत बॅलेट पेपर असेल, तर मतदान करायचे; परंतु ईव्हीएम असेल, तर ते तोडण्याचे प्रात्यक्षिक उदयनराजे दाखवणार आहेत,’’ अशा शब्दांत त्यांनी मतदान यंत्राबाबतचा विरोध दर्शवला.

लोकसभेच्या निवडणुकीतील विजयाबद्दल उदयनराजेंचा कोरेगाव मतदारसंघातर्फे आमदार शिंदे यांच्या हस्ते वडाचीवाडी (ता. कोरेगाव) येथे सत्कार झाला. त्या वेळी ते बोलत होते.

उदयनराजे म्हणाले, ‘‘लोकसभा निवडणुकीतील मतदानादिवशीचे आकडे व मतमोजणीच्या दिवशीच्या आकड्यांमध्ये तफावत असल्याचे चित्र देशातील अनेक मतदारसंघांमध्ये दिसले. म्हणजेच कुठे तरी पाणी मुरतेय. यंत्रणा मॅनेज केल्या गेल्या. ही कसली लोकशाही? ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यावर आवाज उठवला नाही, तर उतमात होईल. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत मी ईव्हीएम चालू देणार नाही. माणसे जोडण्यासाठी ईव्हीएम तोडलेच पाहिजे. आपण विचारांनी एकत्र आलो आहोत. एकीच्या जोरावर आपल्याला झेप घ्यायची आहे. जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणारे आमदार शिंदे यांच्या पाठीशी राहायचे, की पैशाच्या जोरावर भूलथापा देऊन फसवणाऱ्या विरोधकांच्या मागे जायचे, हे जनतेने ठरवावे. आपण सर्व जण ठाम राहिलात, तर विरोधकाचे डिपॉझिट राहणार नाही.’’

शिंदे म्हणाले, ‘‘उदयनराजे यांना आम्ही केवळ ३५ हजारांचे मताधिक्‍य देऊ शकलो, याविषयी खंत आहे. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात विरोधकांनी पैशाचा वापर केला, तरीही प्रामाणिक कार्यकर्त्यांनी निष्ठेने काम केल्याने आपला विजय झाला. आता राज्याला उदयनराजेंची गरज आहे. त्यांच्याभोवती जिल्ह्याचेच नव्हे, तर राज्याचे राजकारण फिरले पाहिजे, अशा पद्धतीने त्यांनी कार्यरत राहावे.’’ बाळासाहेब सोळसकर, सतीश चव्हाण, राजाभाऊ जगदाळे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास शिवाजीराव महाडिक, मिलिंद कदम, सुनील काटकर, अरुण माने, शाहूराज फाळके, शहाजीराव बर्गे, प्रताप कुमुकले, तेजस शिंदे, भास्कर कदम, श्रीमंत झांजुर्णे, जयवंत पवार, संजय पिसाळ, ॲड. पांडुरंग भोसले, राहुल साबळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

‘शायनर’ कार्यकर्त्यांचा समाचार
हातांच्या बोटांमध्ये अंगठ्या, गळ्यात चेन व ती दाखवण्यासाठी छातीवरील बटने उघडी, अशा प्रकारच्या वागणुकीमुळे नेमके काय साध्य होणार?’ अशा शब्दांत खासदार उदयनराजे यांनी ‘शायनर’ कार्यकर्त्यांचा समाचार घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com