आबा, काय घाई होती जाण्याची; शरद पवार गहिवरले

आबा, काय घाई होती जाण्याची; शरद पवार गहिवरले

तासगाव - काय अधिकार होता त्यांना इतक्‍या कमी वयात जाण्याचा...हे त्यांचं वय काय जाण्याचे नव्हते. आमच्या आधी ते गेलेच कसे? म्हणून माझे आर. आर. आबांशी भांडण आहे, असे भावपूर्ण उद्‌गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. काय घाई होती इतक्‍या लवकर जाण्याची ? असे म्हणत ते गहिवरले. 

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते झाले.

श्री. पवार यांनी वीस मिनिटांच्या भाषणात आर. आर. आबांचा जीवनपट उभा केला. ते म्हणाले, ""कसाबला फाशी देण्याच्या निर्णयावर धाडसाने ठाम राहिले. गडचिरोलीचे पालकमंत्रीपद घेऊन मोटारसायकलवरून आदिवासी माणसाचे जीवन समजावून घेतले. आजही गडचिरोलीत त्यांचे आदराने नाव घेतले जाते. मूर्ती लहान असली तरी त्यांचे कर्तृत्व हिमालयाएवढे होते. स्वच्छ चारित्र्याचा आदर्श त्यांनी महाराष्ट्रासमोर उभा केला.'' 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अनिल बाबर, मोहनराव कदम, विश्वजित कदम, सुमनताई पाटील, माजी आमदार सदाशिव पाटील, उमाजी सनमडीकर, वंचित आघाडीचे गोपीचंद पडळकर, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, श्रीमती अनिता सगरे, अविनाश पाटील, रोहित पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

""आमच्यासारख्या नव्या पिढीसमोर आबा आदर्श आहेत. उंची त्याच्या शरीरावरुन नाही तर त्यांच्या कर्तृत्वावरून ठरते. राज्यात शिवस्वराज्य यात्रेतून फिरताना प्रत्येक ठिकाणी त्यांचा आदराने आठवण काढली जाते.''

- अमोल कोल्हे, खासदार

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, ""आबांची उणीव आज राष्ट्रवादीला जाणवत आहे. ते असते तर आज चित्र वेगळे दिसले असते. आगामी विधानसभा निवडणुकीत सुमनताई पाटील यांच्या रूपाने आबांचे विचार जिवंत ठेवा.'' 2024 च्या निवडणुकीत आबांचे चिरंजिव रोहित हे उमेदवार असेल, हेही त्यांनी जाहीर केले. 

आमदार बाबर म्हणाले,""आमची मैत्री शब्दात व्यक्त करता येणार नाही. आज त्यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याची वेळ यायला नको होती.'' 

आमदार डॉ. कदम म्हणाले,""आबांचे आणि पतंगराव कदम यांचे असलेले भावाचे संबंध पुढील पिढीतही राहिल. रोहित माझा भाऊ आहे.'' 

बाजार समितीचे सभापती जयसिंग जमदाडे यांनी प्रास्ताविक केले. रोहित पाटील, बेदाणा व्यापारी अशोक बाफना, अनिता सगरे, विश्वास पाटील, खंडू पवार यांचीही भाषणे झाली. संचालक अजित जाधव यांनी आभार मानले. 

रोहितचे कौतुक 

राष्ट्रवादी काँग्रेसने पुतळा अनावरणानिमिताने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आजच्या कार्यक्रमाला उच्चांकी गर्दी झाली होती. शरद पवार यांच्यासह अनेक वक्‍त्यांनी रोहितच्या रूपाने पुन्हा एक आबा तयार झाल्याची भावना व्यक्त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com