माण काबीज करण्याचे राष्ट्रवादीचे मनसुबे

NCP
NCP

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माण, खटाव तालुक्‍यांतील जलसंधारणाच्या कामांना भेटी देऊन लोकसहभागाला प्रोत्साहन दिले. मात्र, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना बळ देण्याचे त्यांनी दिलेले संकेत हाच विषय चर्चेचा ठरू लागलाय. विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी या मतदारसंघातून सलग दोन वेळा विधानसभेत प्रवेश मिळविला. राष्ट्रवादी काँग्रेसला ही खंत सातत्याने बोचत आहे. पक्षांतर्गत कलहामुळे गोरेंच्याविरोधात तुल्यबळ उमेदवारी शोधण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मोहीम आता देशमुखांपर्यंत पोचली आहे.

पक्षाच्या स्थापनेपासून ताब्यात असलेला माण मतदारसंघ जयकुमार गोरेंनी खेचून घेतला. त्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यासह प्रमुख नेत्यांनी माणवर वर्चस्व मिळविण्यासाठी जंग जंग पछाडले.

वेळोवेळी वेगवेगळे डावपेच करीत गोरेंना शह देण्याचा प्रयत्न केला. जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे यांनाही पक्षाने मैदानात उतरविले. राष्ट्रवादींतर्गत शेखर गोरे वगळता इतर गटांचे प्राबल्य कमी झाले. गोरे बंधूंच्या राजकारणातच माण ढवळून निघू लागला. पुढे शेखर गोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेची उमेदवारीही दिली. मात्र, त्यातही यश मिळाले नाही. शेखर गोरे यांच्यावर काही गुन्हे दाखल झाले. तेव्हापासून ते स्वतः मतदारसंघात नाहीत.

ज्येष्ठ नेते (कै.) सदाशिवराव पोळ यांच्या दोन सुना या जिल्हा परिषद गटातून निवडून आल्याने पोळ यांचा गट पुन्हा सक्षम होऊ लागला. शेखर गोरे यांचा गट, पोळ गट व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा गट अशी राष्ट्रवादीची सुंदोपसुंदी सुरू असतानाच प्रभाकर देशमुख यांच्या रूपाने आणखी एक गट नकळतपणे अस्तित्वात आला. जलसंधारण विभागाचे आयुक्त असताना श्री. देशमुख यांनी माण तालुक्‍यात लक्ष घातले. विविध कामांच्या निमित्ताने संपर्क वाढविला. 

निवृत्तीनंतर राजकारणात येण्याबाबतचे संकेत ते वारंवार धुडकावून लावत. निवृत्तीनंतरही त्यांचा मतदारसंघातील संपर्क वाढत गेला. या पार्श्‍वभूमीवर श्री. पवार यांनी दिलेल्या संकेतामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माणमधील घडामोडी यापुढे राजकारणावर परिणामकारक ठरणार आहेत.

अंतर्गत गटबाजी थोपवण्याचे आव्हान
काँग्रेसचे आमदार असणाऱ्या जयकुमार गोरे यांना थोपवण्याचे आव्हान पक्षापुढे आहे. शेखर गोरे यांच्या गटाने देशमुखांच्या विरोधात उघड भूमिका घेतली आहे. भाजपही मुसंडी मारण्यासाठी सज्ज आहे. त्यासाठी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर व अनिल देसाई यांनी मतदारसंघात तळ ठोकला आहे. या स्थितीत देशमुखांचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे अंतर्गत गटबाजी थोपवण्याचे आव्हान पक्षापुढे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com