राष्ट्रवादीने वैचारिक शत्रू ओळखून पक्षविस्तार करावा; विश्‍वजीत कदम यांचा सल्ला

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 24 October 2020

सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्यासह मिरज पूर्वमधील काही कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यावर कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी टिका करताना राष्ट्रवादीने आघाडी धर्म पाळावा असा सल्ला दिला होता.

सांगली ः राष्ट्रवादी कॉंग्रेसने आपला वैचारिक शत्रू कोण हे नेमके ठरवून पक्षवाढीबाबतचे धोरण ठरवावे असा सल्ला कृषी व सहकार राज्यमंत्री विश्‍वजीत कदम यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. जिल्ह्यातील काही कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबतच्या चर्चेवर भाष्य करताना ते बोलत होते. 

सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांच्यासह मिरज पूर्वमधील काही कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. यावर कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी टिका करताना राष्ट्रवादीने आघाडी धर्म पाळावा असा सल्ला दिला होता.

आज पत्रकार परिषदेत त्यांना याबाबतचा प्रश्‍न विचारला असता ते म्हणाले,"" बाजार समितीच्या निवडणुका पक्षीय पातळीवर होत नाहीत. त्यामुळे ते पदाधिकारी कॉंग्रेसचे होते असं म्हणण्याला अर्थ नाही. मात्र राज्यात आघाडी सरकार आहे. आपला वैचारिक शत्रू कोण हे निश्‍चित आहे. त्यानुसार राष्ट्रवादीने पक्षविस्ताराचा विचार करावा.'' 

ते म्हणाले,"" कॉंग्रेस आपल्या परीने पक्षविस्तार करीत आहे. लोकांमध्ये जाऊन आपली भूमिका मांडत आहे. केंद्राच्या कृषी कायद्यांबाबत कॉंग्रेसने राज्यभर तंत्रज्ञानाचा वापर करून आंदोलन केले. केवळ सांगली जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांनी या आंदोलनात गावागावात सहभाग नोंदवला. जिल्ह्यात कॉंग्रेस मजबुतीने काम करीत आहे. त्यामुळे त्याचे परिणाम आगामी काळात निश्‍चित दिसतील.'' 

ते म्हणाले,"" आघाडी सरकारमध्ये सध्याचा काळ जनतेसमोर काम करून दाखवण्याचा आहे. त्यासाठी नामदार जयंत पाटील आणि मी एकजुटीने काम करीत आहे. जिल्ह्याच्या विकासाआड राजकारण येऊ देणार नाही.'' 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The NCP should identify ideological enemies and expand the party; Vishwajeet Kadam's advice