
कवठेमहांकाळ : तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सहा, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे गटाला दोन, खासदार संजय पाटील गटला दोन ग्रामपंचायती तर बनेवाडी येथे संयुक्त पॅनेल विजयी झाले.
कवठेमहांकाळ : तालुक्यातील 10 ग्रामपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सहा, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे गटाला दोन, खासदार संजय पाटील गटला दोन ग्रामपंचायती तर बनेवाडी येथे संयुक्त पॅनेल विजयी झाले. निवडणुकीत गावातील स्थानिक कार्यकर्त्यांनी सोयीस्कर आघाड्या करून सत्तेचे सिंहासन ताब्यात ठेवले. परस्परांचे राजकीय विरोधक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकत्र झाले आणि निवडणूका लढवल्या.
काही ठिकाणी खासदार संजय पाटील आणि आमदार सुमन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी काही गावात हातात हात घालून काम केले तर काही गावात माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि आमदार सुमन पाटील यांचीही कार्यकर्ते एकत्र येऊन निवडणुका जिंकून दाखवल्या. यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाही सामना झाला.
तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. त्यात अर्ज माघारीच्या दिवशी मोघमवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली. बनेवाडी दोन, रायवाडी आणि तिसंगी येथील प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाल्या. दहा ग्रामपंचायतीच्या निवडणूका अत्यंत चुरशीने शुक्रवारी (दि.15) रोजी मतदान झाले. सोमवारी) तहसील कार्यालयात मतमोजणी झाली.सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ होऊन अवघ्या एक तासात निकाल जाहीर झाले. चोरोची येथे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचे कट्टर समर्थक राजाराम पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या धुवा उडवित नऊच्या नऊ जागा घोरपडे पॅनलला मिळाल्या.
राष्ट्रवादी कॉंग्रेसला एकही जागा आली नाही. राजाराम पाटील यांच्या पॅनेलला चारीमुंड्या चीत करण्यासाठी आमदार सुमन पाटील, खासदार संजय पाटील गटाचे जिल्हा बॅंकेचे संचालक चंद्रकांत हाक्के, सुरेश पाटील यांनी जोराची ताकद लावली होती.परंतु मतदारांनी राजाराम पाटील यांच्या पॅनेलला निवडून येण्यासाठी हातभार लावला. तालुक्यातील अकरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालासाठी तहसीलदार बी.जे.गोरे यांच्या नेतृत्वाखाली निकालाची प्रक्रिया शांततेत झाली.पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयासमोर चोख पोलिस बंदोबस्त होता.निकालानंतर विजयी गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.
संपादन : प्रफुल्ल सुतार