गिरिस्थांनाना वाचवण्याची आवश्‍यकता ; महाबळेश्वर-पाचगणीत सुविधांची वानवा

रविकांत बेलोशे
Friday, 27 September 2019

 "पर्यटन दिनानिमित्त' या गिरिस्थानांना वाचवण्याची गरज भासत आहे. 

भिलार : आज 21 व्या शतकात झपाट्याने बदललेल्या साधनांमुळे जग अधिकाधिक जवळ येत असताना निसर्गाची अद्वितीय नवलाई लाभलेल्या महाबळेश्वर-पाचगणीचे पर्यटन या बदलाची शिकार बनत आहे. अलीकडच्या काळात सर्वमान्यांच्या आवाक्‍यातील महाबळेश्वर पर्यटन अनंत कारणांनी धोक्‍यात येऊ पाहात आहे. आज "पर्यटन दिनानिमित्त' या गिरिस्थानांना वाचवण्याची गरज भासत आहे. 
 

पूर्वी फक्त पर्यटन हंगाम आणि सुट्यांच्या काळात पाचगणी-महाबळेश्वर पर्यटकांनी बहरून जायचे. परंतु, अलीकडच्या काळात विकेंड, मोठी सुटी, पावसाळी पर्यटन यामुळे जवळजवळ बाराही महिने या गिरिस्थानांवर पर्यटकाची वर्दळ जाणवते. पर्यटकांच्या अपेक्षाही दिवसेंदिवस वाढत आहेत. बदलती दळणवळणाची साधने, इ-पेमेंट, ऑनलाइन बुकिंग, नवनवे नियम, निसर्ग पर्यटन, वाहनांची वाढती संख्या, चलनातील बदल, निसर्गसौंदर्याचा ऱ्हास, वाढत चाललेली सिमेंटची जंगले, इंग्रजांच्या काळातील नियम, जुन्या पर्यटनस्थानांचा पुरेसा विकास नाही, पर्यटकांना मिळणाऱ्या सेवा- सुविधांचा अभाव, नवनवी पर्यटनस्थळे निर्माण करण्याची उदासिनता, येथील थंड हवा आणि वनसंपत्तीचा वाढता ऱ्हास, वाढती अतिक्रमणे, बेसुमार वृक्षतोड आणि अनियंत्रित पर्यटनामुळे पाचगणी- महाबळेश्वरमधील नैसर्गिक संपदा आणि खचितच पर्यटन व्यवसायही धोक्‍यात आले आहेत. यासाठी योग्य उपाययोजनांची गरज भासू लागली आहे. 

महाराष्ट्रातील पश्‍चिम घाटाचे केंद्रस्थान म्हणून महाबळेश्वरकडे पहिले जाते. शासनाने पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील ठिकाण म्हणून संपूर्ण महाबळेश्वर तालुक्‍याला घोषित केले आहे. येथील समृद्ध निसर्गसंपदा, आल्हाददायक थंड वातावरणामुळे ब्रिटिशांना महाबळेश्वर आणि पाचगणी भावले आणि तेव्हापासूनच ते थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध झाले. मात्र, बदलाच्या पार्श्‍वभूमीवर अलीकडे येथील डोंगर-दऱ्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. जंगलाच्या ठिकाणी बेसुमार वृक्षतोड होऊन सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. धनदांडग्यांनी जागा खरेदी करून या ठिकाणी टोलेजंग मनोरे उभारले आहेत. तर काहींनी या दऱ्याखोऱ्याची जागाही व्यवसायासाठी व्यापून टाकली आहे. नियमांना पायदळी तुडवून वन विभाग व महसुलाशी साटेलोटे करून बरीच उलाढाल निसर्गसंपदेची हानी करून होऊ लागली आहे. 

महाबळेश्वर आणि जागतिक दर्जाचे शैक्षणिक केंद्र पाचगणीला दरवर्षी 15 ते 20 लाख पर्यटक भेटी देतात. पण, या पर्यटकांना आवश्‍यक सेवा-सुविधा मिळताना दिसत नाहीत. महाळेश्वरचा पर्यटन विकास आराखडा धूळ खात पडून असून, त्याबाबत नुसत्याच घोषणा केल्या जात आहेत. त्यामुळे हा आराखडा सत्यात उतरला पाहिजे. तरच विकासाची द्वारे खुली होणार आहेत. अन्यथा परिस्थिती अशीच राहिल्यास काळ माफ करणार नाही, हे नक्की. 

महाबळेश्वर-पाचगणी पर्यटने वाचवण्यासाठी 
....नवनव्या पर्यटनस्थळांची निर्मिती 
....प्रदूषण व वृक्षतोडीचे नियम कडक करणे 
....वाढणाऱ्या पर्यटकांना सुकर सेवा सुविधा पुरवणे 
....आपले अस्तित्व टिकवण्यासाठी प्रशासनाने अधिक लक्ष देणे 
....वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे 
....निसर्गपर्यटनावर भर देणे 
....धनदांडग्यांवर नियंत्रण ठेवणे 

 

बदलत्या पर्यटनाला सामोरे जाताना येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सुविधा स्थानिकांनी दिल्यास ते पुन्हा पुन्हा येणार आहेत. निवासस्थानांबरोबरच निसर्ग भ्रमंतीही वाढत असताना पर्यटनस्थळांवरील निसर्ग जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तरच आपणाला वाढत्या पर्यटनाचा लाभ होणार आहे. 

- वैभव पाटील, व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Needed more facilities for tourists in Mahabaleshwar-Panchgani