महाराष्ट्रात रस्त्यांकडे दुर्लक्ष; कर्नाटकात डांबरीकरण 

अनिल पाटील
Monday, 4 January 2021

महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागाला जोडणारे खड्डेमय रस्ते दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. महाराष्ट्र शासन, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे सीमाभागातील वाहनधारक, नागरिकांना खाचखळग्यांनी भरलेल्या रस्त्यांमुळे नाहक त्रास होत आहे.

सलगरे : महाराष्ट्र - कर्नाटक सीमाभागाला जोडणारे खड्डेमय रस्ते दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. महाराष्ट्र शासन, लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे सीमाभागातील वाहनधारक, नागरिकांना खाचखळग्यांनी भरलेल्या रस्त्यांमुळे नाहक त्रास होत आहे. बाजारपेठेवरही परिणाम होत आहे. कोणतीही वस्तू, अथा बाजार खरेदीसाठी लोक आता कर्नाटकातील बाजारामध्ये जावू लागले आहेत. 

याबाबतची माहिती अशी, की महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मिरज तालुक्‍यातील सलगरे, चाबुकस्वारवाडी, जानराववाडी, खटाव, आरग, बेडग, शिंदेवाडी, म्हैसाळ ही गावे कर्नाटकच्या सीमेला जोडली गेली आहेत. सलगरे, खटाव, आरग, म्हैसाळ ही गावे आठवडा बाजार आणि मोठी बाजारपेठ असणारी आहेत. शेतकऱ्यांकडून उत्पादित शेतमालाची आयात-निर्यात तसेच रोटी-बेटीचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात चालतात. आठवडा बाजारात भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्ये, शेळ्या, मेंढ्या तर इतरदिवशी म्हैस, गाई, खिलार जातीच्या खोडांच्या खरेदी-विक्रीसाठी तसेच जीवनावश्‍यक वस्तूंच्या आयात-निर्यातीत आणि व्यापारात वाढ होण्यासाठी सीमेला जोडलेल्या रस्त्यांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे. 

सध्या सलगरे-अरळीहट्टी, सलगरे-मदभावी, सलगरे-बमनाळ, सलगरे-पांडेगाव, सलगरे-शिरुर, तसेच खटाव-केंपवाड, खटाव-मंगसुळी, लिंगनूर-शिंदेवाडी, बेडग-मंगसुळी हे रस्ते उदासीन शासकीय धोरणांमुळे दुरुस्तीअभावी खराब झालेत. रस्त्याच्या दोन्ही बाजू झाडा-झुडुपांनी वेढलेल्या आहेत. रस्ते लहान मोठ्या खड्ड्यांनी भरलेले असल्याने मार्गांची अक्षरशः चाळण झाली आहे. खराब रस्त्यांमुळे सीमाभागातील सलगरे, आरग बाजारपेठेवर परिणाम होत आहे. 25 वर्षांचा कालावधी लोटला तरी रस्ते दुरुस्त होत नाहीत. उलट कर्नाटक शासन खेडेगावांपर्यंत सीमारेषेला जोडणारे रस्ते हॉटमिक्‍स करीत आहे. महाराष्ट्राकडूनही खराब रस्त्यांची दुरुस्ती, रुंदीकरणाची अपेक्षा आहे. 

कर्नाटकातून ये- जा घटली 

खाचखळग्यांमुळे कर्नाटक सीमारेषेवर असणारे नागरिक, व्यापारी, वाहनधारक महाराष्ट्रात येण्यास अनुकूल नाहीत. आठवडा बाजारांवरही परिणाम झाला आहे. उलाढालीवर परिणाम झाला आहे. महाराष्ट्र सीमाभागातील रस्ते खराब झाल्याने कर्नाटकातून येणारी धान्य, भाजीपाल्याची आवक घटली आहे. मिरज पूर्वमधील बाजार ओस पडत आहेत. कर्नाटकातील अरळीहट्टी, संबर्गी, मदभावी बाजार फुलले आहेत. 

रस्त्यांचे भाग्य उजाडणार 
जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सलगरे-अरळीहट्टी, सलगरे-शिरुर, संतोषवाडी-बेळंकी या खराब रस्त्यांची दुरुस्ती व एरंडोली येथील जान्हवी देवी मंदीराजवळील पुलाचे बांधकाम जिल्हा नियोजन व विकास समिती (डीपीडीसी) मधून त्वरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्‌वारे दिले आहेत. त्याचा पाठपुरावा एरंडोली गटाचे जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांनी पत्रव्यवहार व समक्ष भेटून केला होता. मंत्री जयंत पाटील यांनी डीपीडीसीतून सिमाभागातील रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश दिल्याने पाठपुराव्याला यश आल्याचे दिसत आहे. 

किलोमीटरला 18 ते 20 लाख 

खडीकरण, डांबरीकरण व कारपेट असा एका किलोमीटर रस्त्याचा खर्च साधारणपणे 18 ते 20 लाख रुपये आहे. त्यानुसार सलगरे-अरळीहट्टी (5 कि.मी.) साठी 1 कोटी रुपये, सलगरे-शिरुर (6 कि. मी.) 1 कोटी 20 लाख रुपये. सलगरे-बमनाळ (4 कि. मी.) 80 लाख रुपये. सलगरे-मदभावी (10 कि. मी.) 2 कोटी रुपये. लिंगनूर-शिंदेवाडी (3 कि.मी.) 60 लाख रुपये. बेडग-मंगसुळी 2 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neglect of roads in Maharashtra; Asphalting in Karnataka