भाजपसमोर नवी आव्हाने

भाजपसमोर नवी आव्हाने

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पंधरा वर्षांच्या सत्तेनंतर भाजप-सेना युती सरकार येऊन आता अडीच वर्षे लोटली. मात्र, हा बदल जिल्ह्याच्या राजकारणात खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालानंतर दिसतो आहे. आजवरच्या काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशा मांडणीतून बाहेर पडलेले राजकारण आता भाजप विरुद्ध सर्व असे वळण घेऊ पाहतेय. जिल्हा परिषदेतील सत्तेचे समीकरण जुळवण्यासाठी दोन्ही काँग्रेस कधी नव्हे ते पहले आप....पहले आपचा सूर लावत आहेत. त्याचवेळी जिल्हाभरात अनेक नवे चेहरे राजकीय पटलावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडत आहेत. कसं असेल हे नवं वळण?
 

जिल्हा परिषदेत गयारामामुळे राष्ट्रवादीचा पराभव, असं विश्‍लेषण जयंत पाटील यांनी काल केलं. त्यांनी असंही म्हटलंय की भाजपमध्ये वैचारिक असं स्वत्व काही उरलेले नाही तिची काँग्रेस झाली आहे. एकूण काय तर राष्ट्रवादीतून गेलेल्या लोकांमुळे भाजपची काँग्रेस झाली असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे या वाक्‍याचा अर्थ असाही होतो की काँग्रेस-राष्ट्रवादी एकच आहेत.  कदाचित जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी राष्ट्रवादीने पुढाकार घ्यावा, असं म्हटले आहे आणि जयंत पाटील तेच काँग्रेसला त्याचमुळे सांगत असावेत. यापुढे दोन्ही काँग्रेसला भाजप विरोधात एकत्र येण्याशिवाय पर्याय नसेल असंही त्यांना सुचवायचं असावं. अस्तित्वासाठी त्यांच्यावर ही वेळ आलीच आहे. 

आघाडीच्या पंधरा वर्षांच्या सत्तेत पतंगराव  कदम, जयंत पाटील, आर. आर. पाटील, प्रतीक पाटील, सदाभाऊ पाटील, मदन पाटील ही नावे आता बाजूला पडत आहेत. सत्तेचे नवे चेहरे म्हणून खासदार संजय पाटील, मंत्री सदाभाऊ खोत, आमदार अनिल बाबर, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक अशी नावे रुजत आहेत. राज्यातील सत्तेमुळे जिल्हा परिषदेतील सत्तेची समीकरणे टिकवणे भाजपला तूर्त तरी सोपे आहे; मात्र भाजपच्या या सत्तेला शिवसेना आणि वाळव्यातील महाडिकांचा टेकू असेल. त्यांचा टेकू हटला तरी नवी समीकरणे तयार ठेवण्यासाठीच एकमुखी नेतृत्व मात्र भाजपकडे आजघडीला नाही. जिल्हा परिषदेची सत्ता मिळवण्यासाठी खासदार पाटील यांनी घेतलेला पुढाकार निकालानंतर मात्र कमी झाल्याचे दिसत आहे. त्यांच्या होमग्राऊंडवरील पराभवामुळे सत्तापदावरील त्यांचा दावा तितका आग्रहाचा राहणार नाही हा पहिला मुद्दा आणि त्यांचे पक्षांतर्गत विरोधक भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासोबत त्यांचे वालचंद प्रकरणापासून बिघडलेले सूर पुन्हा नव्याने जुळलेले नाहीत. पुढच्या सत्तासमीकरणात ते जुळण्याऐवजी बिघडण्याचीच  शक्‍यता अधिक आहे. पलूस, कडेगाव, तासगाव या तीन तालुक्‍यांच्या राजकारणात अंतर्गत पातळीवर नव्या घडामोडी सुरू आहेत.

विशेषतः विधान परिषदेच्या निवडणुकीत मोहनराव कदम यांच्यासाठी खासदारांनी घेतलेली  भूमिका उघड होती. त्याची पतंगरावांनी दिलेली बक्षिसी म्हणजे तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यातील जिल्हा परिषद निवडणुकीतून घेतलेली अघोषित माघार होती. या स्नेहसंबंधात पुढच्या काळात एकमेकांच्या गरजेपोटी वाढ व्हायची शक्‍यता असून त्याचा परिणाम खासदारांच्या पलूस, कडेगावमधील हस्तक्षेपात व्हायची शक्‍यता आहे. जिल्हा परिषदेची सत्ता टिकवण्याची जबाबदारी यापुढे खासदारांपेक्षा पृथ्वीराज देशमुख- विलासराव जगताप यांचीच अधिक असेल. 

आजघडीला या जबाबदारीतून शिराळ्याचे नाईक आणि खासदार थोडे अलिप्तच आहेत. 

या सर्व घडामोडीत सांगलीच्या वसंतदादा पाटील कुटुंबीयांचा थोडाफार असणारा पासंगही आता संपला आहे. हाती उरलेले एकमेव मिरज पंचायत समितीचे सत्ताकेंद्रही आता निसटले आहे. प्रतीक पाटील, विशाल पाटील, जयश्री पाटील यांच्यासमोरची पुढची चार-पाच वर्षे राजकारणात टिकून राहण्यासाठीच्या संघर्षाचीच असतील. जयश्री पाटील यांना म्हणजे पूर्वाश्रमीचा मदन पाटील गट मिरज पूर्व आणि पश्‍चिम अशा दोन्हीकडे गायब झाला आहे किंवा तो भाजपवासी झाला आहे. 

काँग्रेसमधून राष्ट्रवादी वेगळी झाल्यानंतर सुरवातीला विष्णुअण्णा यांनी आणि नंतर जयंत पाटील यांनी जिल्हास्तरावर नेतृत्वाची भूमिका पार पाडली होती. आज भाजपमध्ये गेलेल्या राष्ट्रवादी चमूचे नेतृत्व कोणी करायचे यावर अद्याप एकमत झालेले नाही. त्यामुळे भाजपची सध्याची मिसळ एकजिनसी होण्यासाठी  आणखी अवधीची गरज आहे. हा कालावधी किती  असेल याबद्दलचे भाकीतही घाईचे ठरेल. भाजपचा  जिल्हा नेतृत्वाचा हा शोध सोपा तर नाहीच उलट बिकट आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तेला काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षाही नेतृत्वाच्या या पोकळीचा अधिक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com