पलूस तालुक्‍यात लॉकडाऊननंतर नवे संकट; द्राक्षबागांवर डाऊनीचा प्रादुर्भाव

संजय गणेशकर 
Tuesday, 21 July 2020

पलूस तालुक्‍यातील द्राक्ष बागायतदारांनी लॉकडाऊनधील आर्थिक फटका बसल्यानंतर पुढील वर्षीच्या हंगामाची तयारी सुरू केली. मात्र द्राक्षबागांवर सध्या डाऊनीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

पलूस : तालुक्‍यातील द्राक्ष बागायतदारांनी लॉकडाऊनधील आर्थिक फटका बसल्यानंतर पुढील वर्षीच्या हंगामाची तयारी सुरू केली. मात्र द्राक्षबागांवर सध्या डाऊनीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. यावर्षी काळे भुंगेऱ्यांनी काही भागात द्राक्षवेलीची पाने खाण्यास सुरवात केली आहे. द्राक्षबागायतदार हतबल झाला आहे. 

कोरोनाचे पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने यावर्षी द्राक्षाला मोठा फटका बसला. अत्यल्प दराने व्यापारी व दलालांनी द्राक्षे खरेदी केली. द्राक्षे विकली गेली नाहीत. काही द्राक्षबागायतदारांनी बेदाणे तयार करण्याचा निर्णय घेतला. मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला. बागायतदार कर्जात बुडाला. 

लॉकडाऊनमध्ये बसलेल्या फटक्‍यानंतर द्राक्षबागायतदार पुढच्या हंगामाच्या तयारीला लागले होते. पीक काडी तयार करण्यासाठी बागायतदार प्रयत्न करीत आहेत. ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे पीक काडी तयार करण्यात अडचणी येत आहेत. सध्या दावण्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. द्राक्षवेलीवरील पाने खराब होऊन गळून पडत आहेत. कोणत्याही औषधांचा परिणाम या रोगावर होत नाही. अशी स्थिती आहे. बागायतदार औषधांसाठी प्रचंड खर्च करीत आहेत. औषधांची फवारणी सातत्याने करीत आहेत. 

दुसऱ्या बाजूला द्राक्षबागांवर काळे भुंगेऱ्यांनी काही भागात हल्ला केला आहे. भुंगेरे रात्री पुंजक्‍यांनी येऊन द्राक्षवेलीवरील पानांचा फडशा पाडतात. बांबवडे, तुर्ची, निमणी व इतर काही ठिकाणी भुंगेरे दिसून येताहेत. भुंगेऱ्यांच्या बंदोबस्तासाठी सामुदायिक उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज आहे. 

"काही भागात द्राक्षबागांवर काळ्या भुंगेऱ्यांनी हल्ला केला आहे. वेलीवरील पाला हे भुंगेरे फस्त करीत आहेत. त्याच्या बंदोबस्तासाठी सामुहिक उपाययोजना, शासनाच्या कृषी विभागाने मार्गदर्शन व सहकार्य करावे.'' 
- पांडुरंग संकपाळ, द्राक्ष बागायतदार 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सांगली 

सांगली 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New crisis after lockdown in Palus taluka