#SSCL न्यू इंग्लिश स्कूल,गुरुकुल स्कूल विजयी 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 31 January 2020

सकाळ स्कूल क्रिकेट लीग स्पर्धेतील सामने रंगतदार हाेऊ लागले आहेत. आज (शुक्रवार) सकाळी आठ वाजता अनंत इंग्लिश स्कूल विरुद्ध केएसडी शानभाग विद्यालय यां संघात तसेच दुपारी साडेबारा वाजता पोदार इंटरनॅशनल स्कूल विरुद्ध महाराजा सयाजीराव विद्यालय या संघात सामने हाेतील.

सातारा ः न्यू इंग्लिश स्कूलच्या डावखुरा गोलंदाज प्रथमेश जाधवच्या भेदक गोलंदाजीपुढे अनंत इंग्लिश स्कूलचा संघ अक्षरशः 44 धावांत गारद झाल्याने सकाळ स्कूल क्रिकेट लीग स्पर्धेतील ब गटात न्यू इंग्लिश स्कूलला सहज विजय मिळविता आला. दरम्यान, अ गटात गुरुकुल स्कूलने इक्रा इंग्लिश मीडियम स्कूलचा 83 धावांनी पराभव करत स्पर्धेतील दुसरा विजय नोंदविला.
 
ही स्पर्धा छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात घेण्यात येत आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांच्या हस्ते नाणेफेक झाल्यानंतर अनंत इंग्लिश स्कूलने न्यू इंग्लिश स्कूलच्या विरोधात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. "अनंत'च्या मंदार तारळकरला 18 धावांत (8 चेंडूंत चार चौकार) समर्थ चोपडेने बाद केले. यामुळे संघाची सलामीची जोडी अवघ्या 26 धावांत फुटली. यशराज घाडगेच्या साथीत आलेला सुयोग इंदलकर एका धावेत, त्यापाठोपाठ प्रेम सुर्वे, प्रमोद बर्गेही बाद झाले. यशराजने मैदानावर टिकण्याचा प्रयत्न केला; परंतु प्रथमेश जाधवने त्याला झेलबाद केले. प्रथमेशने 12 चेंडूंत एक चौकरासह दहा धावा केल्या. प्रथमेशच्या भेदक गोलंदाजीपुढे "अनंत'चे एकेक खेळाडू पॅव्हेलियन गाठू लागले. "अनंत'चा डाव 8.3 षटकांत 44 धावांत संपला. 
न्यू इंग्लिश स्कूलच्या प्रथमेशने 2.3 षटकांत चार धावांत पाच गडी बाद केले, तसेच नेत्रदीप वैद्यने दोन, समर्थ चोपडे, हर्षवर्धन अष्टेकर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

विजयासाठी 45 धावांचे उद्दिष्ट "अनंत'ने 4.5 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. नेत्रदीप वैद्यने 16 चेंडूंत चार चौकारांसह नाबाद 22 केल्या. त्याला अथर्व कुलकर्णी 13 (9 चेंडूंत तीन चौकार) व हर्षवर्धन अष्टेकरची (नाबाद एक धाव) साथ लाभली. "अनंत'च्या सुयोग इंदलकरने एक गडी बाद केला. क्रीडाधिकारी स्नेहल जगताप यांच्या हस्ते प्रथमेश जाधवला सामनावीरचे पारितोषिक देण्यात आले. 

गुरुकुल स्कूल विजयी गुरुकुल स्कूल आणि इक्रा इंग्लिश मीडियम स्कूल या सामन्याची नाणेफेक विजय फर्मचे संचालक विजय औताडे यांच्या हस्ते करण्यात आली. "इक्रा'ने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले. "गुरुकुल'च्या शार्दुल फरांदे व आदित्य कणसे या सलामीच्या जोडीला "इक्रा'च्या सईद आणि साद बागवान यांनी अनुक्रमे सहा व सात धावांत बाद करून संघावर दडपण टाकले. त्यानंतर आलेल्या आर्य जोशी व अद्वैत प्रभावळकर यांनी मैदानावर तळ ठोकला. दोघांनीही एकेरी दुहेरी धावा घेत संघाचा गुणफलक हलता ठेवला. 115 धावांची भागीदारी झाली असताना अद्वैतचा त्रिफळा साद बागवानने उडविला. अद्वैतने 25 चेंडूंत एक षटकार व तीन चौकारांसह 41 धावा केल्या. त्यानंतर आर्य जोशी संघाची धावसंख्या 177 असताना बाद झाला. आर्यने 58 चेंडूंत एक षटकारासह 13 चौकार ठोकत 86 धावा केल्या. "गुरुकुल'च्या निर्धारित 20 षटकांत 8 बाद 198 धावा झाल्या.

Video : मी पुन्हा येईनने नेटकऱ्यांत घातला धुमाकूळ

प्रत्युतरात इक्रा इंग्लिश स्कूलच्या संघास निर्धारित 20 षटकांत सहा बाद 115 धावांचा टप्पा गाठता आला. यामध्ये साद बागवानने 43 चेंडूंत दहा चौकारांसह 56 धावा, तर साद जावेद बागवानने 45 चेंडूंत तीन चौकारांसह 35 धावा केल्या. "गुरुकुल'च्या शार्दुल फरांदेने तीन, राहुल वाघमळेने दोन, तर प्रथमेश वेळेकरने एक गडी बाद केला. "गुरुकुल'ने हा सामना 83 धावांनी जिंकला. मेघा इंजिनिअरिंगच्या विशाल ढाणे यांच्या हस्ते आर्य जोशीला सामनावीर पारितोषिक देण्यात आले.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New English School And Gurukul School Won In Sakal School Cricket League