"न्यू महाबळेश्वर'मुळे जिल्ह्यातील 52 गावे विकासाच्या अजेंड्यावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

 "न्यू महाबळेश्वर'मुळे गती; पाटण 21 हजार, जावळी दहा तर साताऱ्याचे पाच हजार हेक्‍टर क्षेत्राचा समावेश.

कऱ्हाड ः सातारा जिल्ह्यात लवकरच साकारणाऱ्या "न्यू महाबळेश्वर'मध्ये जिल्ह्यातील पाटण, सातारा व जावळी तालुक्‍यांतील 52 गावांचा समावेश आहे. त्यात पाटणमधील सर्वाधिक 29, जावळीतील 15 तर साताऱ्यातील आठ गावांचा समावेश आहे. त्या प्रकल्पासाठी एकूण 37 हजार 258 हेक्‍टरचे क्षेत्र गृहित धरले आहे. त्यात पाटणमधील 21 हजार 445, जावळीतील दहा हजार 118 आणि साताऱ्यातील पाच हजार 695 हेक्‍टरचा समावेश आहे. 
 

तिन्ही तालुक्‍यांतील 11 गावांतील एक हजारपेक्षा जास्त क्षेत्र प्रकल्पात समाविष्ट आहे. पाटणमधील कुसवडे येथील तीन हजार 76 हेक्‍टर क्षेत्राचा प्रकल्पात समावेश आहे. न्यू महाबळेश्वरसाठी सरकारने रस्ते विकास महामंडळाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला आहे. त्यासाठी सल्लागार समितीची नेमणूकही करण्यात येणार आहे. आराखडा कसा असावा, याबाबतची अधिसूचना काढली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील तीन तालुक्‍यांतील 52 गावांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्या भागाच्या विकासाला गती मिळणार आहे. त्याची कार्यवाहीही लवकरच सुरू होणार आहे. 
 

आराखड्यातील तालुकानिहाय गावे (कंसात प्रकल्पात समाविष्ट हेक्‍टरचे क्षेत्र)  

पाटण ः नहींबे (618), दास्तान (193), कुसावडे (3076), रासाटी (770), देवघर तर्फ हेळवाक (23), गोषटवाडी (573), आरळ (1189), कुशी (710), भारसाखळे (1169), बाजे (313), घानबी (993), बॉड्री (690), बानझोळे (413), चाफोली (200), दिवशी खुर्द (1154), काठी (354), नानेल (335), सावरघर (598), वाटोळे (911), गोजेगाव (2014), खिवशी (396), वाजेगाव (1627), भांबे (660), घेरादातेगड (351), केर (260), आंबेघर तर्फ पाटण (223), चिरंबे (223), गाडवखोप (406), कारवट (852). 
 

 जावळी ः म्हावशी (313), मांजर शेवंदी (105), मौजे शेवंदी (204), फळणी (303), देऊर (2140), वाघळी (312), मुनावळे (1195), जांबरुख (528), उंबरेवाडी (481), वेळे (2114), वासोटा (391), सावरी (341), कसबे बामणोली (510), अंधेरी (331), कास (850). 
 

सातारा ः चाळकेवाडी (1321), ठोसेघर (1446), धावली (450), आलवाडी (176), जांभे (542), नावली (414), चिखली (866), केळवली (480). 

आराखड्यातील वैशिष्ट्ये- 

* व्याघ्र प्रकल्पाच्या बफर व कोअर झोनसह जास्त उंचीच्या क्षेत्रातील विकास नियमानुसार होणार. 
* पर्यावरणाच्यादृष्टीने संवेदनशील क्षेत्रासाठी निर्बंध बंधनकारक. 
* इको-सेन्सिटिव्ह झोनच्या अधिसूचनाही ज्या गावांना लागू होतात, त्या पाळल्या जाणार. 
* पश्‍चिम घाट इको-सेन्सिटिव्ह झोनचेही नियम बंधनकारक. 
* व्याघ्र प्रकल्पातील गावांचा समावेश होत असल्यास तेथे व्याघ्र प्राधिकरणाचे नियम बंधनकारक. 
* न्यू महाबळेश्‍वरच्या हद्दी जाहीर केल्यानंतर एक महिना लोकांसाठी खुल्या ठेवणार. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New Mahabaleshwar on the agenda of development of 52 villages in the district