गाडीच्या किमतीपेक्षा दंड जादा !  मोटर वाहन कायद्यात नवीन तरतुदी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

मोठ्या दंडापासून वाचण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांच्या पालनाबाबत अधिक सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे. 

सातारा : मोटार वाहन कायद्यातील नवीन तरतुदींमुळे दंडाच्या रकमेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. ई-चलन मशिनमध्ये अद्याप त्याबाबतचा बदल न केल्यामुळे जिल्ह्यात जुन्याच पद्धतीने दर आकारणी होत आहे. परंतु, मोठ्या दंडापासून वाचण्यासाठी नागरिकांनी वाहतूक नियमांच्या पालनाबाबत अधिक सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे. 

वाहतूक नियम पाळण्याबाबत लोकांमध्ये जागृता निर्माण व्हावी, यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत असते. परंतु, तरीही त्याकडे दुर्लक्ष करत नियम धाब्यावर बसवत वाहन चालवणाऱ्यांची संख्याही कमी होत नव्हती. कायद्याचा जरब वाटून तरी, त्यांच्याकडून वाहतूक नियमांचे पालन होण्यासाठी दंडात्मक कारवाईची तरतूद मोटर वाहन कायद्यात आहे. परंतु, यातील दंडाची रक्कमही काळानुरूप अत्यंत कमी वाटत होती. त्यामुळे अनेकजण मोठ्या थाटात दंड भरण्याची तयारी दर्शवायचे. त्यामुळे नागरिकांमध्ये कायद्याच्या पालनाविषयी आदर निर्माण करण्यासाठी दंडाची रक्कम वाढविण्याचा केंद्र शासन विचार करत होते. त्यानुसार नुकताच केंद्रीय मोटार वाहन कायद्यामध्ये बदल करण्यात आला. त्यानुसार वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली. त्यानुसार वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यास मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. 
यापूर्वी किमान शंभर रुपये दंड भरावा लागत होता. परंतु, तोच किमान दंड आता 500 रुपयांवर गेला आहे. त्याचबरोबर अपघाताला ज्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरतात, त्यासाठी दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणावर वाढविली आहे. त्यात दारू पिऊन वाहन चालविल्यास दहा हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. तर, अल्पवयीन मुलाला गाडी चालविण्यास दिल्यास पालकाला जबाबदार धरून तब्बल 25 हजार रुपये दंड किंवा तीन वर्षांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. वाहन चालविण्याचा परवाना नसला तरीही पाच हजार रुपये दंडाची तरतूद आहे. एक सप्टेंबरपासून नव्या तरतुदी केंद्राने लागू केल्या आहेत. राज्यामध्ये मात्र, अद्याप या नवीन कायद्याच्या तरतुदींबाबत काही अध्यादेश लागू झालेला नाही. त्यामुळे राज्यात अद्याप नव्या कायद्यानुसार दंड आकारणी सुरू झालेली नाही. ई-चलन मशिनमध्येही त्यानुसार बदल झालेले नाहीत. तरीही वाहन चालविण्याचा परवाना किंवा अन्य काही बाबींसाठीचा दंड कमी करून राज्यात हे नियम लागू होणार आहेत. त्यामध्ये गंभीर अपराधासाठीची दंडाची रक्कम तशीच राहण्याची शक्‍यता आहे. 
नव्या नियमामुळे वाहतूक पोलिस किंवा उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी पकडल्यास वाहन चालविण्याचा परवाना नसणे, हेल्मेट, पीयूसी, नंबरप्लेट अशी विविध कारणे एकत्रित असल्यास काही जणांच्या गाडीच्या किमतीपेक्षाही जास्त दंड भरावा लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहतूक नियमांची माहिती घेऊन कागदपत्रे व वाहनाची स्थिती अद्ययावत ठेवण्यासाठी नागरिकांकडून प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. नवीन दंडाच्या तरतुदींना समाजमाध्यमांवर काही टिकात्मक संदेशही फिरत आहेत. परंतु, वाहनचालकाच्या सुरक्षिततेसाठी या गोष्टींना प्राधान्य देत नागरिकांनी नियम पालनाबाबत अधिक काटेकोर होणे आवश्‍यक आहे. 

...असे आहेत महत्त्वाचे दंड 

-साधारण रस्ता नियमाचा भंग-500 रुपये 
-परवाना नसताना वाहन चालविणे-पाच हजार 
-मद्यपान करून वाहन चालविणे-दहा हजार 
-ट्रीपल सिट वाहन चालविणे-दोन हजार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New provisions of fine in motor vehicle law