विद्यापीठाच्या संचालक पदांकडे इच्छुकांची पाठ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जानेवारी 2020

सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तारानंतर डॉ. मृणालिनी फडणवीस यांची कुलगुरूपदी नियुक्‍ती झाली. त्यांनी विद्यार्थी हिताचे निर्णयही घेतले मात्र, परीक्षा विभागातील गैरप्रकार, कामकाजात बाहेरील व्यक्‍तींचा हस्तक्षेप यासह अन्य कारणे पुढे करीत सहा महिन्यांत तीन मोठ्या अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले.

सोलापूर : पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे तत्कालीन प्र-कुलगुरू डॉ. एस. आय. पाटील, परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत कोकरे, इन्क्‍यूबेशनचे संचालक डॉ. सुहास धांडे यांनी राजीनामा दिल्याने संबंधित विभागांची पदे रिक्‍त झाली आहेत. विद्यापीठाने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक, इन्क्‍यूबेशन सेंटरचे संचालक, फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्‍नॉलॉजीच्या संचालकपदासाठी अर्ज मागविले. मात्र, 14 दिवसांत विद्यापीठाकडे एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. 

सोलापूर विद्यापीठाच्या नामविस्तारानंतर डॉ. मृणालिनी फडणवीस यांची कुलगुरूपदी नियुक्‍ती झाली. त्यांनी विद्यार्थी हिताचे निर्णयही घेतले मात्र, परीक्षा विभागातील गैरप्रकार, कामकाजात बाहेरील व्यक्‍तींचा हस्तक्षेप यासह अन्य कारणे पुढे करीत सहा महिन्यांत तीन मोठ्या अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. परीक्षा नियंत्रक डॉ. कोकरे यांनी वेतन निश्‍चितीची कागदपत्रे मुदतीत न दिल्याने त्यांच्याकडून राजीनामा घेण्यात आला. या सर्व प्रकारानंतर प्राचार्य संघटना, सुटा संघटनेसह काही सिनेट सदस्यांनी कुलगुरूंचा मागितलेला राजीनामा, विद्यापीठातील परीक्षा विभागाची प्रलंबित चौकशी यासह अन्य कारणांमुळे या पदांवर काम करण्यास बाहेरील व्यक्‍ती येण्यास इच्छुक नसल्याची चर्चा आहे. 31 जानेवारीच्या मुदतीत अर्ज प्राप्त न झाल्यास त्यासाठी पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ दिली जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले. विद्यापीठातील महत्त्वपूर्ण या तिन्ही पदांवर पूर्णवेळ अधिकाऱ्यांची गरज असतानाही मागील दोन-तीन महिन्यांपासून प्रभारी अधिकाऱ्यांवर या विभागांचे कामकाज सुरू आहे. 

31 जानेवारीपर्यंत अर्जाची मुदत 
परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक, इनोव्हेशन, इन्क्‍यूबेशन सेंटरचे संचालक, फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्‍नॉलॉजीचे संचालक पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 2 जानेवारीपासून अद्याप एकही अर्ज प्राप्त झाला नसून 31 जानेवारीपर्यंत इच्छुकांनी अर्ज पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 
- डॉ. विकास घुटे, कुलसचिव, सोलापूर विद्यापीठ 

ठळक बाबी... 
- तिन्ही विभागांचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांकडेच 
- 2 जानेवारीपासून आतापर्यंत संचालक पदांसाठी एकही अर्ज नाही 
- 31 जानेवारीपर्यंत अर्ज मागविण्याची मुदत : अधिकाऱ्यांकडून ओळखीच्यांची चाचपणी 
-  प्र-कुलगुरू यांचा कारभारही प्रभारी अधिकाऱ्यांकडेच : राजीनाम्यांमुळे इच्छुकांची पाठ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: news of solapur university director positions