पुढीलवर्षी शाळांना मिळणार ८१ दिवस सुटी...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

शिक्षण खाते दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शाळेचे वेळापत्रक जाहीर करते. त्यानुसार उन्हाळी सुटी संपल्यानंतर २९ मेपासून शैक्षणिक वर्षाला सुरवात होणार आहे.

बेळगाव - शिक्षण खात्याने २०२०-२१ सालच्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्षात २४० दिवस शाळा भरणार असून दसरा, उन्हाळी सुटीसह एकूण ८१ दिवस शाळांना सुटी मिळणार आहे.
शिक्षण खाते दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात शाळेचे वेळापत्रक जाहीर करते. त्यानुसार उन्हाळी सुटी संपल्यानंतर २९ मेपासून शैक्षणिक वर्षाला सुरवात होणार आहे. तर महात्मा गांधी जयंतीनंतर ४ ऑक्‍टोबरपासून दसरा सुटीला सुरवात होणार आहे. शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्राला २६ ऑक्‍टोबरपासून प्रारंभ होईल. काही दिवसांपूर्वी शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी अभ्यासक्रम वेळेत पूर्ण व्हाव,ा यासाठी सुटीत कपात करण्यात येईल, अशी माहिती दिली होती. परंतु, पुढील वर्षातील सुटीत कोणत्याही प्रकारची कपात केलेली नसून ७७ सरकारी, तर ४ स्थानिक सुट्ट्यांचा शाळांना लाभ मिळणार आहे. मे महिन्याच्या अखेरीस शाळांना सुरवात झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना गणवेष, पाठ्यपुस्तके यांचे वितरण केले जाईल. गणवेश विद्यार्थ्यांनाच शिवून घ्यावा लागणार असून पहिल्या टप्प्यात एकच गणवेश वितरीत केला जाईल. दुसरा गणवेश देण्याबाबत अद्याप शिक्षण खात्याने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

वाचा - Valentine Day Special ; सलाम तिच्या धाडसी निर्णयाला; कर्करोगग्रस्त प्रथमेशसोबत केला विवाह

आगामी वर्षात पाठ्यपुस्तकात कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही. त्यामुळे पाठ्यपुस्तकांची छपाईही सुरु केली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना वेळेत पुस्तके कशी वितरीत होतील, याकडे लक्ष देण्याची सूचना शिक्षण खात्याने अधिकाऱ्यांना केली आहे. खासगी शिक्षण संस्थांच्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. तर सरकारी शाळांत मे महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.

  • वेळापत्रकावर एक नजर
  •   पहिले शैक्षणिक सत्र : २९ मे ते २ ऑक्‍टोबर
  •   दुसरे शैक्षणिक सत्र : २६ ऑक्‍टोबर ते १४ एप्रिल
  •   सुटीचा कालावधी : ३ ऑक्‍टोबर ते २५ ऑक्‍टोबर व १५ 
  •    एप्रिल ते २९ मे

पुढील वर्षीच्या शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार शाळांना अभ्यासक्रमाचे नियोजन करावे लागणार आहे. सध्या शाळांना परीक्षांच्या तयारीकडे लक्ष देण्याची सूचना केली आहे.
-ए. बी. पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Next year schools will get eighty one days leave