'निंबाळकरांचा विजय केवळ मोहिते-पाटील यांच्याच कर्तृत्वामुळे नाही'

उमेश घोंगडे
रविवार, 26 मे 2019

निंबाळकर यांच्या विजयाचे श्रेय एकटे मोहिते-पाटील घेऊ शकत नाहीत. केवळ मोहिते-पाटील यांच्या ताकदीवर निंबाळकर यांचा विजय झाला. असे म्हणणे म्हणजे जनतेच्या आणि पक्षातील वरिष्ठांच्या डोळ्यात धूळफेक केल्यासारखे होईल, हे संबंधितांनी लक्षात घ्यावे.'' 

पुणे : माढा लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा विजय हा केवळ मोहिते पाटील यांचा नाही तर माळशिरस तालुक्‍यातील मोहिते-पाटील यांच्या पारंपरिक विरोधकांनी केलेल्या परिश्रमाचा विजयात मोठा वाटा आहे, अशी भूमिका या तालुक्‍यातील कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. नाईक निंबाळकर यांचा विजय हा सर्वांनी प्रामणिकपणे केलेल्या कष्टाचे फळ आहे. हे यश कुणा एकाचे नाही, अशी भूमिका तालुक्‍यातील भाजपाचे नेते के. के. पाटील यांनी व्यक्त केली. 

पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे तालुक्‍यात काम करीत आहेत. मोहिते-पाटील यांचे पारंपरिक विरोधक अशी त्यांची ओळख आहे. तालुक्‍यातील आणखी एक मोहिते-पाटील विरोधक उत्तम जानकर यांचाही निंबाळकर यांच्या विजयात मोठा वाटा असल्याचे पाटील यांनी सांगितले. आपल्या दाव्याच्या पुष्टर्थ्य पाटील यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीची तसेच विधानसभा निवडणुकीची आकडेवारी सांगितली. 

ते म्हणाले, "गेल्या लोकसभा निवडणुकीत मोहिते-पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार होते. त्यावेळी त्यांना माळशिरस विधासभा मतदारसंघातून केवळ 38 हजार मतांचे अधिक्‍य मिळाले होते. यावेळी निंबाळकर यांचे तालुक्‍यातील मताधिक्‍य एक लाख 203 इतके आहे. विधानसभा निवडणुकीत मोहिते-पाटील यांचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार दिवंगत हनुमंत डोळस यांना 77 हजार 179 मते मिळाली होती. डोळस यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी-स्वाभीमानी शेतकरी संघटना पुरस्कृत उमेदवार अनंत खंडागळे यांना तब्बल 70 हजार 934 मते मिळाली होती. खंडागळे यांच्यामागे आम्हा साऱ्यांची ताकद होती. शिवसेनेचे उमेदवार लक्ष्मण सरवदे यांना 23 हजार 567 मते मिळाली होती. या शिवाय आमच्यातील बंडखोर उमेदवार बाळासाहेब धाईंजे यांना सात हजार 700 मते मिळाली होती.

मोहिते-पाटील विरोधकांची ही ताकद या निवडणुकीत एकत्रित होती. त्यामुळे निंबाळकर यांच्या विजयाचे श्रेय एकटे मोहिते-पाटील घेऊ शकत नाहीत. केवळ मोहिते-पाटील यांच्या ताकदीवर निंबाळकर यांचा विजय झाला. असे म्हणणे म्हणजे जनतेच्या आणि पक्षातील वरिष्ठांच्या डोळ्यात धूळफेक केल्यासारखे होईल, हे संबंधितांनी लक्षात घ्यावे.''


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nimbalkars victory is not only due to Mohite Patils achievements says k k patil