
निपाणीत दोन वर्षांनी उघडणार 'तिसरा डोळा! CCTV कॅमेरा
निपाणी : दोन वर्षापासून बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे पुन्हा सुरू होणार आहेत. त्यासाठी मंत्री शशिकला जोल्ले यांनी आमदार फंड व एकसंबा बिरेश्वर उद्योग समूहातून स्वतंत्र निधी उपलब्ध केला आहे. त्यातून शहरासह सीमेवरील २८ ठिकाणी ५३ सीसीटीव्ही कॅमेरे व संवेदनशील परिसरात ६ ठिकाणी माहिती देणारे स्पीकर बसविले आहेत. लवकरच त्याचे लोकार्पण होणार आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे शहर व उपनगरात सुरू असलेल्या विविध गुन्ह्यांसह घरफोड्यांच्या घटनांवर नियंत्रण मिळण्यास मदत होणार आहे. यापूर्वी नगरपालिका व राज्य सरकारतर्फे शहरात ट्रॅफिक सिग्नल व सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित केली होती. मात्र २०१९ पासून कॅमेरे व सिग्रल यंत्रणा बंद होते. विविध गुन्ह्यांसह घरफोड्यांचे प्रमाण वाढले आहे. शिवाय शहरातील वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्याचा गांभीयाने विचार करून मंत्री शशिकला जोल्ले व खासदार जोल्ले यांनी कॅमेऱ्यांसाठी निधी उपलब्ध केला आहे. गेल्या तीन महिन्यात शहर व उपनगरात सर्वेक्षण करून २८ ठिकाणी ५३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. कॅमेरे उच्च दर्जाचे असून त्यात १५० मीटर दूरवरील छबी स्पष्ट दिसणार आहे. कंट्रोल रूममधून सीसीटीव्ही कॅमेरयाच्या आधारे पोलिसांना वेळेत माहिती मिळावी, यासाठी ६ स्पीकरही कार्यान्वित केले आहेत. लवकरच बसस्थानक सर्कल व अक्कोळ क्रॉस येथे सिग्नल यंत्रणा कार्यरत होणार आहे.
यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा ठेका बंगळूर येथील कंपनीला दिला होता. त्यामुळे वारंवार होणाऱ्या बिघाडाची दुरुस्ती होण्यास वेळ लागत होता. मात्र आता बसविलेली यंत्रणा स्थानिक ममदापूर के. एल. येथील इंटिग्रेटेड टेक्नॉलॉजिमार्फत कार्यान्वित केली आहे.
सीसीटीव्हीची मुख्य ठिकाणे
सद्या बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेरयांपैकी शहरातील बेळगावनाका, गांधी हॉस्पिटल, मुरगूड रोड भुयारी मार्ग, आंदोलननगर भुयारी मार्ग, अक्कोळ क्रॉस, अक्कोळ रोड, हालसिद्धनाथ मंदिर, चिक्कोडी रोड, रामपूर ओढा या प्रमुख ठिकाणांसह मुख्य चौक व वर्दळीच्या ठिकाणी कॅमेरे बसविले आहेत. बेळगावनाका, कोठीवाले कॉर्नर, नेहरू चौक, बसस्थानक, गांधी चौकासह अन्य ठिकाणी स्ट्रांॅग रूमवरून देण्यात येणारी माहिती तातडीने मिळावी, यासाठी स्पीकर बसवले आहेत.
'शहर व परिसरात २८ ठिकाणी ५३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्याची चाचणी झाली असून लवकरच लोकार्पण होणार आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेला गुन्ह्यांचा तपास सोयीचे होणार आहे.'
-संगमेश शिवयोगी,मंडल पोलिस निरीक्षक, निपाणी
Web Title: Nipani Third Eye Cctv Camera Two Year
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..