शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या नाहीच, केवळ होणार विनंती बदल्या

अजित झळके
Friday, 7 August 2020

कोरोना संकटामुळे प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या स्थगित करण्याचा आदेश आज राज्य शासनाने दिला. त्यामुळे केवळ विनंती बदल्या कराव्यात, त्यातही शासनाची मार्गदर्शक तत्त्वे काटेकोरपणे पाळावीत, असे आदेश देण्यात आले आहेत.

सांगली : कोरोना संकटामुळे प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या स्थगित करण्याचा आदेश आज राज्य शासनाने दिला. त्यामुळे केवळ विनंती बदल्या कराव्यात, त्यातही शासनाची मार्गदर्शक तत्त्वे काटेकोरपणे पाळावीत, असे आदेश देण्यात आले आहेत. याबाबतचे पत्र आज राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना मिळाले असून, शिक्षक संघ, शिक्षक समिती, शिक्षक भारतीसह सर्वच संघटनांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. 

शिक्षकांच्या बदल्यांचा घोळ संपता संपायला तयार नव्हता. प्रशासकीय बदल्या करायच्या झाल्यास जिल्हा परिषद समुपदेशन सत्र घ्यावे लागले असते. त्यासाठी गर्दी झाली असती. कोरोना संकट काळासाठी लागू केलेल्या अटी व नियमांना हरताळ फासली गेली असती. हे टाळण्यासाठी प्रशासकीय बदल्यांना स्थगिती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. या वेळी विनंती बदल्या मात्र कराव्यात, असे म्हटले आहे. हे करताना शासन आदेशातील सर्व अटी-शर्तींचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे एकदाचा गोंधळ संपला आहे. 

शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंदराव सूर्यवंशी व अमोल माने म्हणाले, ""या निर्णयासाठी शिक्षक संघाने खूप प्रयत्न केले. राज्य पातळीवरून ताकद लावली. त्यामुळे हा निर्णय झाला.'' 

शिक्षक संघाचे (शि. द. पाटील गट) जिल्हाध्यक्ष विनायकराव शिंदे म्हणाले, ""आमचे नेते संभाजीराव थोरात यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेतली होती. त्यांनी आमच्या विनंतीची दखल घेत प्रशासकीय बदल्या रद्द केल्या आहेत.'' शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड म्हणाले, ""शिक्षक समितीने याविषयी सतत पाठपुरावा केला. या संकटात प्रशासकीय बदल्या करणे योग्य ठरले नसते.'' 

कोरोनाचे संकट एवढे मोठे असताना राज्य शासन आणि जिल्हा परिषद प्रशासनही बदल्यांसाठी का खेळ करीत आहे? एक वर्ष बदल्या झाल्या नाही म्हणून आभाळ कोसळणार आहे का? आता आहे तशीच स्थिती ठेवा, जो जिथे आहे तिथे राहू द्या. शाळा सुरू व्हायची काहीच चिन्हे नाहीत आणि बदल्यांचा पट मांडून काय साध्य होणार आहे? अशा पद्धतीने संपूर्ण यंत्रणेने खेळ मांडला आहे. जगात काय सुरू आहे आणि आपण कशावर ताकद लावतोय, याचे भान यंत्रणेने ठेवण्याची गरज आहे. 
- जितेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य 

संपादन : प्रफुल्ल सुतार 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No administrative transfers of teachers, only requested transfers