जिल्ह्यातील दुसऱ्या थेट सरपंचाविरोधातील अविश्वास मजूर... कुठे?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 February 2020

देवर्डे (ता. वाळवा) येथील सरपंच सौ. रेखा पाटील यांच्यावर अविश्वास ठराव मतदानाच्या माध्यमातून पारित झाला. जिल्ह्यातील दुसऱ्या थेट सरपंचाविरोधातील अविश्वास मजूर झाला आहे...

ऐतवडे खुर्द : देवर्डे (ता. वाळवा) येथील सरपंच सौ. रेखा पाटील यांच्यावर अविश्वास ठराव मतदानाच्या माध्यमातून पारित झाला. या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे पाठविला जाणार असून पुढील प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्याकडून होणार असल्याची माहिती गटविकास अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

देवर्डे येथील सरपंचांवर अविश्वास ठरावाच्या मागणीनुसार वाळवा तहसीलदार यांच्याकडून बुधवारी (ता.12) सदस्यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत गुप्त पद्धतीने मतदान झाले. या मतदान प्रक्रियेत सरपंच रेखा पाटील यांच्या विरोधात सात मते पडली आहेत. त्यामुळे सरपंच यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मतदान घेण्यासाठी बहुमताने मंजूर करण्यात आला होता. 

विकास कामात टाळाटाळ व विलंब, सरपंच बाहेर गावी रहात आहेत, यामुळे विकासात्मक कामाला गती मिळत नाही, सरपंच ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कामकाजात मनमानी कारभार करत आहेत, कोणत्याही सदस्यांना विश्वासात न घेता ते काम करतात, त्यांचे पती अनाधिकृतपणे ग्रामपंचायतीच्या प्रत्येक कामात हस्तक्षेप करतात, त्यामुळे गावाच्या विकासाला खीळ बसली असून विकासात्मक अनेक गोष्टी रखडल्या जाऊ लागल्या आहेत, याशिवाय कोणत्याही विकास कामांची माहिती देण्याच्या प्रक्रियेत जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे, असे आरोप सरपंच रेखा पाटील यांच्यावर सदस्यांकडून करण्यात आले होते. 

आज घेण्यात आलेल्या सरपंच अविश्वास ठराव निवडणूक प्रक्रियेत सरपंचांवर अविश्वास ठराव 211 मतांनी पारित झाला. एकूण मतदान 936 आहे. यापैकी झालेले मतदान 508 आहे. सरपंच रेखा पाटील यांच्याविरोधात 349 मते पडली असून सरपंचांच्या बाजूने 138 मतदान झाले आहे. 12 मते बाद ठरली आहेत. एकंदरीत सरपंच रेखा पाटील यांच्या विरोधात अविश्वास ठराव 211 मतांनी पारित झाला असल्याचे गटविकास अधिकारी वाळवा यांच्याकडून जाहीर करण्यात आले. 

निवडणूक पीठासीन अधिकारी म्हणून गट विकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी तर सुरक्षा व्यवस्थेचे काम कुरळप पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अरविंद काटे यांनी पाहिले. सहाय्यक गटविकास अधिकारी अजिंक्‍य कुंभार, आनंदराव पवार, ग्रामसेविका आशाराणी पाटील यांच्यासह विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no confidence motion against second sarpanch in Sangali district