मुदतवाढ नाहीच...सांगली बाजारसमिती निवडणूक फेब्रुवारीत? 

घनशाम नवाथे 
Thursday, 21 January 2021

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी बाजार समितीच्या निवडणुकीला कोणतीही मुदतवाढ दिलेली नाही.

सांगली : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असल्या तरी बाजार समितीच्या निवडणुकीला कोणतीही मुदतवाढ दिलेली नाही. त्यामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालकांना दिलेली मुदतवाढ 26 फेब्रुवारीला संपणार आहे. तत्पूर्वी निवडणूक कार्यक्रम लागणार आहे. पणन विभागाने त्याला दुजोरा दिल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात बाजार समिती निवडणुकीचे पडघम वाजतील, असे चित्र आहे. 

कोरोनाच्या महामारीमुळे जिल्ह्यातील सर्वच सहकारी संस्था आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे काही संस्थाच्या संचालक मंडळाला सहा महिने ते एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे. राज्यात पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकानंतर नुकतेच ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे पाहून आठवड्यापूर्वी सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास हिरवा कंदील दाखवला. सहा टप्प्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले. पहिल्या टप्प्यात अंतिम मतदार यादी निश्‍चित झालेल्या संस्थांच्या निवडणुका 18 जानेवारीपासून घेण्याचे निश्‍चित केले होते. 

जिल्ह्यात 1528 सहकारी संस्थांच्या निवडणुका वर्षभरात घेण्याचे निश्‍चित झाले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 173 सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार होत्या. त्यामध्ये जिल्हा बॅंकेसह सहकारी संस्थांचा समावेश होता. निवडणुकीसाठी हालचाली सुरू असताना तीन दिवसापूर्वी सहकार विभागाच्या विभागीय सचिवानी पुन्हा एकदा निवडणुकांना स्थगिती दिली. तसेच 31 मार्चपर्यंत सहकारी संस्थांच्या संचालकांना मुदतवाढ दिली. त्यामुळे जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील संस्थाच्या निवडणुका पुढे गेल्या आहेत. 

एकीकडे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या असल्या तरी सांगती कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मात्र ठरल्याप्रमाणे वेळेत होईल. बाजार समितीच्या निवडणुकीला कोणतीही मुदतवाढ दिलेली नाही. सध्याच्या संचालकांची मुदतवाढ 26 फेबुवारीला मुदत संपणार आहे. ही मुदत संपण्यापूर्वी निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नूतन सदस्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्यामुळे मिरज, जत आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत.

 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No extension ... Sangli market committee election in February?