पाणी येतं केव्हातर अन् बिल आलं हजारभर...!

राजेंद्र हजारे
Saturday, 18 January 2020

तीन विभागांतील काही प्रभागांत या पाण्याची चाचणी झाली आहे. प्रत्यक्षात सर्वांनाच २४ तास पाणी मिळत नाही. तरीही नवीन वर्षापासून रीडिंगनुसार पाण्याची बिले दिली जात आहेत.

निपाणी (बेळगाव) - शहरात आशियाई विकास बॅंकेच्या माध्यमातून २४ तास पाणी योजना राबविण्यात आली आहे. तीन विभागांतील काही प्रभागांत या पाण्याची चाचणी झाली आहे. प्रत्यक्षात सर्वांनाच २४ तास पाणी मिळत नाही. तरीही नवीन वर्षापासून रीडिंगनुसार पाण्याची बिले दिली जात आहेत. कागवाडे प्लॉट, शिरगुप्पी रोड परिसरात केव्हातरी पाणी येत असताना बिले हजारो रुपयांत आल्याने २४ तास पाणी योजनेची तऱ्हाच न्यारी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

२४ तास पाण्याची तऱ्हाच न्यारी

२४ तास पाणी योजनेसाठी तीन विभाग केले आहेत. त्याद्वारे काही ठिकाणी चाचणी झाली असली तरी अद्याप काही ठिकाणी पाणी पोहोचले नाही. वारंवार गळतीमुळेही लाखो लिटर पाणी वाया जाते. कंत्राटदारांनी जानेवारीपासून मीटरनुसार बिल आकारणी सुरू केली आहे. कागवाडे प्लॉट परिसरातील नागरिकांना पहिल्या टप्प्यात पाणी न वापरताही केवळ ठरलेल्या मीटरनुसार तब्बल ४ हजार ८४५ तर काही ठिकाणी तीन हजार रुपयांपर्यंत बिले दिलेली आहेत. यापूर्वी पाणीपुरवठा सुरू असताना नागरिकाकडून दरमहा १२० भरून घेतले जात होते. पाण्याचे बिल जास्त येत असल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

वाचा - कर्नाटक पोलिसांना महाराष्ट्राच्या मंत्र्याने दिला असा चकवा...

सामान्य कुटुंबांना आर्थिक फटका

सर्वच प्रभागांत व्हॉल्वची सोय नसल्याने बऱ्याच ठिकाणी सखल भागात पाणी पडून जाते. तर काही ठिकाणी चार घागरी पाण्यासाठी दिवसभर थांबावे लागत आहे. अशा परिस्थितीत संबंधित कंत्राटदारांनी मीटरनुसार रिडिंग सुरू करणे चुकीचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. केवळ चार ते पाच तास पाणी सोडून २४ तास पाण्याची बिले वसूल केली जात आहेत. त्यामुळे आता संबंधित कंत्राटदाराच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत नागरिक आहेत. पूर्वीप्रमाणे दरमहा १२० रुपये बिल आकारण्याची मागणी होत आहे.

शिरगुप्पी रोड आणि कागवाडे प्लॉट परिसरात पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होत नसताना केवळ पंधरा ते वीस दिवसांत चार हजारांवर पाण्याची बिले आली आहेत. ही बिले मागे न घेतल्यास आंदोलन केले जाईल.
- सचिन गारवे, 
सामाजिक कार्यकर्ते, निपाणी

‘२४ तास पाणी’ योजना चांगली असली तरी अद्याप बरेच कामकाज रखडले आहे. संबंधित कंत्राटदारांनी पाहणी करूनच सुरळीत पाणीपुरवठा झाल्यावर मीटरनुसार बिले देणे योग्य आहे.
-संदेश सूर्यवंशी,
 रामनगर, निपाणी

शहरासह उपनगरात काही ठिकाणी 
सुरळीत पाणीपुरवठा नाही. त्यासाठी व्हॉल्वची गरज आहे. त्यादृष्टीने वरिष्ठांना सांगितले असून लवकरच 
त्याची पूर्तता होईल. त्यानंतर समान पद्धतीने पाणीपुरवठा होईल. नवीन वर्षापासून मीटर नुसार बिल भरणे आवश्‍यक आहे.
- सुदर्शन उळेगड्डी, सुपरवायझर, २४ तास पाणीपुरवठा योजना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No getting water on time but water bills are being paid according to the readings