esakal | ना तपासणी, ना सर्व्हेक्षण...पत्रे ठोकायची ठेकेदारांची घाई 
sakal

बोलून बातमी शोधा

No inspection, no survey, Contractors hurry to send letters

दोन दिवस त्याच्या कुटुंबियाकडे ना आरोग्य यंत्रणा फिरकली ना महापालिकेचे अधिकारी. ना तपासणी झाली. ना सर्व्हेक्षण. दोन दिवसानंतर त्या मृताच्या घराच्या आवाराला पत्रे ठोकायला मात्र ठेकेदार गेला. 

ना तपासणी, ना सर्व्हेक्षण...पत्रे ठोकायची ठेकेदारांची घाई 

sakal_logo
By
शैलेश पेटकर

सांगली : तो गेला...मृत्यूचे कारण कोरोना असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले. मात्र दोन दिवस त्याच्या कुटुंबियाकडे ना आरोग्य यंत्रणा फिरकली ना महापालिकेचे अधिकारी. ना तपासणी झाली. ना सर्व्हेक्षण. दोन दिवसानंतर त्या मृताच्या घराच्या आवाराला पत्रे ठोकायला मात्र ठेकेदार गेला. गरीब कष्टकऱ्याच्या वाल्मिकी आवास परिवारातील ही कथा महापालिकेच्या पत्रे ठोकण्याच्या प्रेमाची साक्ष देणारी. 

खरे तर "तो' एरवीही 24 तास मद्याच्या नशेत असे. दोन दिवसांपूर्वी टाळेबंदी असूनही तो कामाच्या शोधासाठी बाहेर पडला. फिट आल्याने मारुती रस्त्याला पडला म्हणून त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. रात्रभर तो पडून होता. सकाळी बेवारस मृतदेह असल्याचे पोलिसांना समजले. वाल्मिकी परिसरातील नातेवाईकांची ओळख पटवून सिव्हिलमध्ये उत्तरीय तपासणीसाठी नेले. तेथे मृत्यूपश्‍चात कोरोना चाचणीत बाधीत असल्याचे स्पष्ट झाले. मग नियमाप्रमाणे कुटुंबासह अंत्यसंस्कार झाले. आज दोन दिवसानंतर महापालिकेची यंत्रणा थेट पत्रे घेऊन वाल्मिकी आवास परिसर दाखल झाली. 
या दोन दिवसांत मृताच्या संपर्कातील कोणाची तपासणी नाही. विलगीकरण नाही. मात्र आज पत्रे मारण्यासाठी ठेकेदारांची मात्र घाई सुरु होती. 

या कुटुंबातील एक सदस्य म्हणाले,""आधी निगेटीव्ह अहवाल असल्याचे सांगण्यात आले. अर्ध्या तासात पुन्हा बाधीत असल्याचे सांगितले. मृतदेहाच्या गाडीत बसवून अंत्यसंस्कारासाठी नेले. तेव्हा चाचणी न करता पुन्हा घरी पाठवले. आज पुन्हा तपासणी न करताच घेऊन गेले. हे काय चाललेय?'' 
रहिवाशांच्या प्रश्‍नांच्या सरबत्तीपुढे अधिकारी निरुत्तर झाले. वातावरण तापले. अखेर स्थानिक माजी नगरसेवकांच्या मध्यस्थीनंतर प्रकरणावर पडदा पडला. तरी गरीबांच्या वस्तीबाबत प्रशासकीय यंत्रणेच्या असंवेदनशील कारभाराचे दर्शन घडवणारा हा प्रकार आहे. 
 

""दोन दिवसांत इकडे आरोग्य विभागाला पहायला सवड झाली नाही. मग पत्रे ठोकायला कशी सवड झाली? वाल्मिकी आवासमधील प्रत्येक कुटुंबाची चुल रोज कामावर गेले तर पेटते. विलगीकरणात ठेवून त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था कोण करणार? लोकांना विश्‍वासात न घेता प्रशासन कंटेन्मेंटच्या उपचारात अडकले आहे.'' 

-शेखर माने, माजी नगरसेवक 

""सिव्हिलने ऍन्टीजेन चाचणीअंती तो मृत पॉझिटीव्ह घोषित केला. परस्पर अंत्यसंस्कारही केले. मात्र महापालिका यंत्रणेला कळवले नाही. या तांत्रिक त्रुटीमुळे आमची यंत्रणा तिथे उशिरा पोहचली. कुटुंबातील सदस्यांसह परिसरात सर्व्हे-चाचण्या उद्यापासून करीत आहोत.'' 

-डॉ. वैभव पाटील 
आरोग्य अधिकारी महापालिका 

संपादन : प्रफुल्ल सुतार