सदाभाऊ, पडळकरांसह विधान परिषद आमदारांना बैठकीला डावलले 

अजित झळके
Monday, 20 July 2020

पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीला माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, ज्येष्ठ आमदार मोहनराव कदम आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना डावलण्यात आल्याने मोठा गदारोळ उठला आहे.

सांगली ः पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कोरोना आढावा बैठकीला माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, ज्येष्ठ आमदार मोहनराव कदम आणि आमदार गोपीचंद पडळकर यांना डावलण्यात आल्याने मोठा गदारोळ उठला आहे. या बैठकीत जिल्ह्याच्या शहरी भागात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला खासदार आणि आमदारांना आमंत्रित करण्यात आले आणि त्यांची मतेही जाणून घेतली गेली, मात्र त्यात विधान परिषद आमदारांना डावलण्यात आले. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग आणणार असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. 

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या एक हजाराहून अधिक झाली आहे. शहरांसह ग्रामीण भागात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत निघाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जयंत पाटील यांनी आज महत्वाची बैठक आयोजित केली. त्यात लॉकडाऊन हाच मुख्य विषय होता. त्यावर आठ विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि खासदार यांना बोलावण्यात आले होते. राज्यमंत्री विश्‍वजीत कदम हेही हजर होते. ही बैठक सुरु होण्याआधी सदाभाऊ खोत हे जिल्हाधिकारी कार्यालयात दूध आंदोलनाबाबतचे निवेदन देण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबत खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ होते. त्यावेळी त्यांच्या सहकारी आमदारांनी येथे थोड्या वेळात बैठक होणार असल्याचे सदाभाऊंना सांगितले. सदाभाऊंना त्याची कल्पनाच नव्हती. त्यांनी त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा केली. 

सदाभाऊ यांनी "सकाळ'शी बोलताना ती घटना सांगितले. ते म्हणाले, ""मी जिल्हाधिकाऱ्यांना बैठक कधी आहे, असे विचारले. त्यावर त्यांनी "कुठली बैठक? आज कसली बैठक नाही.' असे सांगितले. सोबतच, तुमचे काही काम असेल तर मला सांगा', असे ते म्हणाले.'' 
याविषयी सकाळशी बोलताना सदाभाऊ म्हणाले, ""मी विद्यमान आमदार आहे. काही काळ मंत्री राहिलो आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात जिल्ह्याची आढावा बैठक होणार असेल तर त्यांनी आम्हाला बोलावले पाहिजे. हे कुणी सांगण्याची गरज नाही. विधान परिषद आमदारांना दुय्यम वागणून देता काय? मी आणि गोपीचंद पडळकर आम्ही एकत्रितपणे जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग आणणार आहोत. इथे हम करे सो कायदा सुरु आहे काय?'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no invitition to sadabhau khot for corona meeting in sangli