सांगलीत या समाजाच्या दफनविधीसाठी जागाच नाही

No land for Christian community's Cemetery in Sangali
No land for Christian community's Cemetery in Sangali

सांगली : वडर कॉलनी येथील ख्रिश्‍चन समाजाच्या दफनभूमीतील जागा संपली आहे. त्यामुळे तेथे मृतदेह दफन करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने पूर्वी दफन केलेला मृतदेह बाहेर काढून तेथे दुसऱ्या मृतदेहाचे दफन करण्याची वेळ समाजावर आली आहे. महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून तातडीने ख्रिश्‍चन समाजासाठी नवीन दफनभूमीचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी समाजातून होत आहे.

सांगली शहर परिसरात मोठ्या संख्येने ख्रिश्‍चन समाज आहे. या समाजासाठी वडर कॉलनीत दफनभूमी आहे. मात्र तेथे जागा संपल्याने दफनभूमीच्या जागेचा प्रश्न गंभीर बनला आहे. जिल्हा अल्पसंख्याक समितीचे माजी अध्यक्ष अशोक सीताराम लोंढे यांच्या मागदर्शनाखाली गेली काही वर्षे समाज दफनभूमीसाठी नवीन जागा मिळवण्यासाठी सातत्याने महापालिकेकडे पाठपुरावा करत आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.

तत्कालीन सांगली नगरपालिका असताना ख्रिश्‍चन समाज दफनभूमीसाठी वडर कॉलनी येथे 20 गुंठे जागा दिली होती. येथे आता दफनविधी करण्यासाठी जागाच शिल्लक नाही. शहर व परिसरातील ख्रिश्‍चन समाजासाठी ही एकमेव दफनभूमी आहे. मात्र येथे आता दफनविधीसाठी जागाच शिल्लक नसल्याने पूर्वी दफन केलेला मृतदेह काढून त्या ठिकाणी नवीन मृतदेहाचे दफन करावे लागत आहे. मात्र या खोदाईत दफन केलेल्या मृतदेहाचे अवयव वर येत असल्याने या मृतदेहांची विटंबना होत आहे. पुन्हा हे अवयव एका कपड्यात गुंडाळून दफन करावे लागतात. 

ख्रिश्‍चन समाजाच्या दफनभूमीसाठीसाठी नवीन जागा मिळावी यासाठी अशोक लोंढे यांनी समितीच्या बैठकीतही आवाज उठवला. याची दखल घेऊन शासनाने महापालिका व जिल्हाधिकाऱ्यांना ख्रिश्‍चन समाजाला दफनभूमीसाठी नवीन जागा देण्याचे आदेश दिले. पण त्याची अद्याप कार्यवाही झालेली नाही. शामराव नगर येथील दफनभूमीसाठी राखीव असलेली जागा ख्रिश्‍चन व मुस्लिम समाजाला देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सहा एकर पैकी दीड एकर जागा ख्रिश्‍चन (ख्रिस्ती) समाजाला देण्याचा ठराव महासभेत ऑक्‍टोबर 2017 मध्ये करण्यात आला. यानंतर तत्कालीन आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी या जागेचा भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवला. मात्र त्यानंतर या प्रस्तावाबाबत महापालिका प्रशासनाने कोणताही पाठपुरावा केला नाही. त्यामुळे ख्रिश्‍चन समाजाच्या दफनभूमीच्या जागेचे भूसंपादन रखडले असून ते ते तातडीने मार्गी लावून समाजाला नवीन दफनभूमी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अशोक लोंढे यांनी केली आहे. 

फेर प्रस्ताव द्यावा लागणार 
शामराव नगर येथील जागा दफनभूमीसाठी भूसंपादन करण्याचा प्रस्ताव महापालिकेने दिला होता. मात्र त्यात अनेक त्रुटी होत्या, सात बारा जुळत नव्हते. त्यामुळे हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेकडे परत पाठवला आहे. त्यातील त्रुटी दूर करून तो पुन्हा सादर केल्यास भूसंपादनाचा विषय मार्गी लागणार आहे. 

पावसाळ्यापूर्वी  दफन भूमीसाठी जागा द्या

समाजात एखादा मृत झाल्यास त्याच्या दु:खापेक्षा मृतदेह दफन करण्याची चिंता अधिक असते. वडर कॉलनीतील दफनभूमीतील जागा संपली आहे. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने दफन भूमीसाठी जागा द्यावी अन्यथा समाजात एखादे मृत झाल्यास महपालिकेच्या दारातच दफन करावे लागेल. 
- अशोक लोंढे, माजी अध्यक्ष, जिल्हा अल्पसंख्याक समिती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com