यंदा महापुराची रिस्क नको : नागरिकांकडून स्वयं आपत्ती व्यवस्थापन

flood.jpg
flood.jpg
Updated on

सांगली- गतवर्षीच्या महापुराच्या पार्श्‍वभूमीवर यंदा महापालिका प्रशासनाने पूरपट्ट्यातील जनतेला सावधगिरी म्हणून पाणीपातळी 25 फुटांवर जाताच स्थलांतर होण्याची सूचना केली आहे. त्यामुळे पूरपट्ट्यातील उपनगरातील कुटुंबांनी माधवनगर, विश्रामबागसह पुराच्या कक्षेत न येणाऱ्या उपनगरांमध्ये फ्लॅट, गाळे भाड्याने घेण्यासाठी चौकशी करुन काहींनी बुकींगही केले आहे. 


कृष्णा नदीस गतवर्षी आलेल्या महापुराने सुमारे पावणे दोन लाख नागरिकांना फटका बसला होता. बाजारपेठ उध्वस्त झाली होती. मोठ्या संख्येने घरांची पडझड झाली होती. त्यावेळी महापालिकेसह राज्यातील इतर जिल्ह्यांमधूनही पूरग्रस्तांसाठी मोठी मदत आली होती. तर पूरग्रस्तांसाठी 70 हून अधिक निवारा केंद्रे सुरु करुन तेथे त्यांची सोय केली होती. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर निवारा केंद्रांमध्ये पूरग्रस्तांना एकत्र ठेवण्यात अडचणी असल्यामुळे प्रशासनाने पूरपट्यातील नागरिकांना स्वत:ची सोय करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे पूरपट्ट्यातील नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी मिरज, कुपवाड, विश्रामबाग, माधवनगरसह संजयनगर, अभयनगर, सह्याद्रीनगर आदी परिसरात तात्पुरते भाड्याने फ्लॅट, गाळे, गोडावून घेण्यासाठी चौकशी सुरु केली आहे. 

विश्रामबाग परिसरात वन बीएचके फ्लॅटचे भाडे सुमारे सहा ते आठ हजार इतके आहे. तर टू बीएचके फ्लॅटचे भाडे 10 ते 12 हजारांपर्यंत आहे. गाळ्यांचे तसेच गोडावूनचे भाडे त्याचा आकारानुसार असले तरी किमान दहा हजारांपासून पुढे आहे. हेच भाडे उपनगरांमध्ये एक-दोन हजार रुपयांनी कमी आहे. 

गतवर्षी निम्मी सांगली पाण्यात 
गतवर्षी ऑगस्ट महिन्यात आलेल्या पुराने सांगली शहरातील नदीकाठच्या उपनगरांमध्ये तसेच मिरजेत कृष्णा घाट परिसरात हाहाकार माजला होता. सन 2005-06 नंतर असा महापूर आला होता. आठवडाभर निम्मी सांगली पाण्यात होती. सांगली कॉलेज कॉर्नर परिसर, हिराबाग कॉर्नर, मराठा समाज, डी मार्टच्या मागील बाजूस प्रथमच पुराचा दणका बसल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांचे नुकसानही कोट्यवधींच्या घरात होते. त्यामुळे यंदा कोणतीही रिस्क घ्याची नाही अशारितीने पूरग्रस्त पुर्वतयारीला लागले आहेत. सांगली शहराबाहेर गोडावून असलेल्या व्यापाऱ्यांनी आपला माल तेथे हलवण्यास सुरुवात केली आहे. तर बेसमेंटच्या गाळेधारकांनीही साहित्याच्या सुरक्षिततेची तयारी चालवली आहे. 


गेल्या वर्षी पूरग्रस्तांसाठी 70 निवारा केंद्रे सुरु केली होती. तेथे त्यांच्या निवास आणि भोजनाचीही सोय केली होती. पण, यंदा तशी स्थिती नाही. कोरोनामुळे निवारा केंद्रात पूरग्रस्तांना मोठ्या संख्येने एकत्र ठेवता येणार नाही. त्यामुळे ज्यांना शक्‍य आहे त्यांनी महापुराचा अंदाज घेऊन वेळीच स्थलांतर करावे. तसेच आपल्या घर अथवा दुकानाचा आतील साहित्यासह फोटो घेऊन ठेवावा म्हणजे पंचनामे करुन शासनाकडून मदत मिळवताना त्याचा पुरावा म्हणून उपयोग होईल आणि मदत मिळण्यात अडचण येणार नाही. 
- नितीन कापडणीस, महापालिका आयुक्त. 


गेल्या वर्षी रात्रीत नदीचे पाणी वाढून शहरात पाणी आले होते. त्यामुळे यंदा पूर येणार हे गृहीत धरुन व्यापाऱ्यांनी स्वयं आपत्ती व्यवस्थापनाची तयारी केली आहे. माधवनगर, मिरज, विश्रामबाग, कुपवाड परिसरात गाळे, फ्लॅट भाड्याने बुकींग केले जात आहे. व्यापाऱ्यांना या तयारीसाठी प्रशासनाने अतिरिक्त दोन तास वेळ वाढवून द्यावी. 
श्री. समीर शहा, अध्यक्ष व्यापारी एकता असोसिएशन 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com