
बेळगाव : सीईटीवेळी घड्याळ वापरण्यास मनाई
बेळगाव : शिक्षक भरतीसाठी होणाऱ्या सीईटीवेळी परीक्षार्थीना घड्याळ वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. परीक्षा केंद्रांवर ओएमआर शीटही पोलीस बंदोबस्तात पोचविल्या जाणार आहेत. तसेच पेपर सुरु होण्यापूर्वी परीक्षार्थींची तीनवेळा तपासणीही करण्यात येणार आहे. पीएसआय भरतीवेळी मोठ्या प्रमाणात गोंधळ निर्माण झाल्यामुळे राज्यात सध्या याचीच चर्चा सुरु आहे. परीक्षेत झालेल्या गैरप्रकाराची चौकशीही सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे, येत्या २१ व २२ मे रोजी होणाऱ्या सीईटीवेळी ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सीईटीबाबत सातत्याने आढावा घेतला जात आहे.
सर्व केंद्रांवर परीक्षार्थींची तब्बल तीनवेळा तपासणी केली जाणार आहे. कोणताही बोगस परीक्षार्थी परीक्षा केंद्रांवर जाऊ नये किंवा ब्लुटूथ हेडफोन अशा अत्याधुनिक उपकरणांचा परीक्षाकाळात वापर होऊ नये याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाणार आहे. परीक्षार्थींना कोणत्याही प्रकारचे घड्याळ वापरता येणार नसून ओएमआर शीट पुरविण्यासाठी विशेष पथक स्थापन केले जाणार आहे. या पथकासमवेत शस्त्रधारी पोलीस असतील. त्यामुळे शिक्षण खाते परीक्षेबाबत अधिक खबरदारी घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. परीक्षेबाबतची मार्गसूची १४ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा जवळ आल्याने परीक्षार्थी अभ्यासात तर शिक्षण खाते सीईटीच्या तयारीत असे चित्र दिसत आहे.
जिल्ह्यात १७ हजार परीक्षार्थी
बेळगाव जिल्ह्यात २५ केंद्रांवर परीक्षा पार पडणार असून १७ हजारहून अधिक परीक्षार्थी आहेत. त्यामुळे, परीक्षा केंद्रांवर सर्व प्रकारची काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Web Title: No Use Of Watch During Cet Exam Omr Sheets Police Security Belgaum
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..