पशुधन अधिकारी नावालाच, डॉक्‍टर नाही कामाला; खरसुंडी येथील स्थिती

हमीद शेख
Saturday, 3 October 2020

खरसुंडी पशुवैद्यकीय दवाखान्यात गेली सात महिने "पशुधन अधिकारी फक्त नावाला, डॉक्‍टर नाही कामाला' अशी अवस्था झाल्याने पशुधन शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

खरसुंडी (जि. सांगली) : खरसुंडी पशुवैद्यकीय दवाखान्यात गेली सात महिने "पशुधन अधिकारी फक्त नावाला, डॉक्‍टर नाही कामाला' अशी अवस्था झाल्याने पशुधन शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. सहा गावात बावीस हजार पशुधन असलेल्या दवाखान्याची ही अवस्था शासनाने केली आहे. 

खरसुंडी पशुवैद्यकीय दवाखाना सहा गावे कार्यक्षेत्र असलेला आहे. तालुक्‍यात खरसुंडी व नेलकरंजी दोनच पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी-2 मध्ये आहे. खरसुंडी व नेलकरंजी या दवाखान्याकडे कोणीच लक्ष अद्याप दिलेले नाही. खरसुंडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात गेली सात ते आठ महिने सहायक पशुधन अधिकारी नुसता नावाला आहे. ज्यावेळी शेतकरी दवाखान्यात पशुधन घेऊन येतात त्यावेळी डॉक्‍टर कधीच नसतो. नुसता परिचर दवाखान्यात असतो.

ऑगस्टमध्ये नवीन पशुधन अधिकाऱ्याची नियुक्ती झाली. त्यांनी पण दोन महिन्यात किती शेतकऱ्यांचे पशुधन तपासले हे त्यांनाच माहित. काहींना या दवाखान्यात पशुधन अधिकारी आहे, हेच माहित नाही. पशुधन शेतकरी या दवाखान्याचा कारभारावर वैतागून खाजगीतून जनावरावर उपचार करून घेत आहेत. जनावरांच्या कोणत्याच लशी या दवाखान्या मार्फत डॉक्‍टर नसल्यामुळे करण्यात येत नाहीत. 

या दवाखान्याअंतर्गत खरसुंडी, घाणंद, चिंचाळे, मिटकी, धावडवाडी व आवटेवाडी अशी सहा गावे येतात. सहा गावातील 22 हजार जनावरे कार्यक्षेत्रात आहेत. अशी ही कार्यक्षेत्र व जनावरे असणाऱ्या दवाखान्याची अवस्था अत्यंत संतापजनक आहे. दवाखान्याला असणारे कंपाऊंड तत्काळ करण्यात येऊन पशुधन अधिकाऱ्याची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. 

शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

पशुवैद्यकीय दवाखान्याची पशुधन अधिकारी कायमस्वरूपी नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण ठरते आहे.तालुका व जिल्हा पातळीवरील वरिष्ठानी तत्काळ याकडे लक्ष वेधून कायमस्वरूपी पशुधन विकास अधिकारी नेमणूक करावी. गेली सात ते आठ महिने या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी नियमित नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 
- सौ. लता पुजारी, सरपंच 

दवाखान्याच्या अडचणी होणार नाहीत
एक ऑक्‍टोबर पासून खरसुंडी येथे नियमित काम करण्याचा वरिष्ठ अधिकारी या बरोबर झालेल्या चर्चेचे ठरले आहे. चांगले काम करून पशुधन शेतकऱ्याची सहानुभूती मिळू शकतो. यापुढे दवाखान्याच्या अडचणी होणार नाहीत. 
- शंकरराव साळुंखे, पशुधन विकास अधिकारी (सध्या नेमणूक) 

कायमस्वरूपी अधिकाऱ्याची नेमणूक करावी

खरसुंडी पशुवैद्यकीय दवाखान्याची डॉक्‍टर विना अडचण निर्माण झाली आहे. नेमणुकीस असलेले वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात हजर राहत नसल्यामुळे पशुधन शेतकरी मोठ्या अडचणीत येत आहे. वरिष्ठांनी कायमस्वरूपी पशुधन विकास अधिकाऱ्याची नेमणूक करावी. 
- अर्जुन पुजारी, पशुधन शेतकरी

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no Veterinary doctor at work in Kharsundi