
सांगली : सहा महिने सतत तक्रारी करुनही पिण्याचे पाणी येत नाही. मात्र त्याची बिले पाठवली जातात. यामुळे संतप्त झालेल्या महापालिकेच्या प्रभाग 18 मधील नागरिकांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले.
सांगली : सहा महिने सतत तक्रारी करुनही पिण्याचे पाणी येत नाही. मात्र त्याची बिले पाठवली जातात. यामुळे संतप्त झालेल्या महापालिकेच्या प्रभाग 18 मधील नागरिकांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. आंदोलनस्थळी आलेल्या पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना जाब विचारल्यानंतर बाचाबाची झाली. महापौर आणि आयुक्तांनी लक्ष घालून पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. महापौर गीता सुतार यांनी आंदोलनस्थळी नागरिकांची भेट घेत पाणी पुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली.
महापालिकेच्या प्रभाग 18 मधील शामरावनगरात सहा महिने पाणी पुरवठा होत नाही. नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. नगरसेविका नसिमा नाईक, सामाजिक कार्यकर्ते रज्जाक नाईक यांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केली. मात्र अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले. उलट पाणी मिळत नसताना पाण्याची बिले मात्र पाठवली. त्यामुळे आज नागरिकांचा संताप अनावर झाला. पाणी पुरवठा विभागाच्या निषेधार्थ सकाळी साडे अकराच्या सुमारास नगरसेविका नसिमा नाईक, रज्जाक नाईक आणि परिसरातील नागरिक थेट आकाशवाणीमागे उभारलेल्या नवीन पाण्याच्या टाकीवर चढले. त्यांनी "पाणी द्या, पाणी द्या' अशी घोषणाबाजी सुरु केली. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना शोलेस्टाईल आंदोलनाची माहिती मिळताच ते घटनास्थळी आले. नागरिकांनी त्यांना जाब विचारला. अधिकाऱ्यांशी बाचाबाचीही झाली.
नगरसेविका नसिमा नाईक म्हणाल्या,""सहा महिने पाणी मिळत नाही. नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यालाही दाद दिली नाही. आज अशा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. महापौर आणि आयुक्तांनी लक्ष घालून प्रभाग 18 मध्ये पाणी पुरवठा सुरळीत करावा.
जावेद नदाफ, सुमित शिंदे, रोहित जगदाळे, सलमा मुजावर, मन्सूर नाईक, मुन्ना शेख, निलेश जगदाळे आदी नागरिक आंदोलनात सहभागी झाले.
संपादन : प्रफुल्ल सुतार