टाळेबंदी नव्हे, हवेत निर्बंध आणि स्वयंशिस्त; यांची आहे भावना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता आता शहरात होत असलेल्या गर्दीवर काही निर्बंध आणले पाहिजेत अशी सार्वत्रिक भावना आहे.

सांगली ः शुक्रवारी दिवसभरातील कोरोना रुग्णांचा वाढलेला आकडा पाहता पुन्हा एकदा टाळेबंदी लागते की काय या आशंकेने सर्वांना पछाडले होते. मात्र कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता आता शहरात होत असलेल्या गर्दीवर काही निर्बंध आणले पाहिजेत अशी सार्वत्रिक भावना आहे. शहरातील काही व्यापारी व विक्रेत्यांशी या अनुषंगाने संवाद साधला असता अनेक पर्याय चर्चेत आले. प्रशासनाने व्यापारी प्रतिनिधींशी संवाद ठेवला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त झाली. 

प्रामुख्याने शहरातील पेठांमध्ये सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत होणारी गर्दी चिंता वाटावी अशीच आहे. दत्त मारुती रस्ता, कापड पेठ, गणपती पेठ, जुने स्टेशन रस्ता, खणभाग, रिसाला रस्ता, एसटी स्थानक परिसर अशा सर्वच रस्ते आणि कापड पेठांमध्ये दिवसभर गर्दी असते. खरेदीचा कालावधी मर्यादित केल्यामुळेही ही गर्दी अधिकच केंद्रित होत आहे. शिवाय या परिसरात सहज म्हणून येणाऱ्यांची संख्या कमी नसते. हेच चित्र कमी अधिक प्रमाणात मिरज आणि कुपवाडमध्येही दिसते. यापुढे पुन्हा टाळेबंदी न लावता पुरेशी दक्षता घेऊन लोकांना कोरोनासोबत जगण्यासाठी तयार करणे गरजेचे असेल. त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांनाही शिस्त लावण्यासाठी नव्याने काही निर्बंध-नियम तयार करता येतील का या दृष्टीने सुचना पुढे आल्या. 

  • गेले काही दिवस या सर्व प्रमुख पेठांमध्ये फळ-भाजीपाला विक्रेते पुन्हा बसू लागले आहेत. यासाठी म्हणून दररोज गर्दी होत आहे. शहरातील प्रमुख गर्दीच्या परिसरातून यापुढे रस्त्यावरील सर्व विक्रेत्यांना बसण्यास मनाई करावी. जेणेकरून त्यासाठी म्हणून या भागात लोक येणार नाहीत. 
  • दुकानांचे कापड,धान्य-किराणा, हार्डवेअर, चप्पल-कॉस्मेटिक, भांडी-इलेक्‍ट्रॉनिक्‍स अशी प्रमुख वर्गवारी करून ती आठवड्यातून किमान दोन दिवस सक्तीने बंद ठेवण्याचे निर्णय घ्यावेत. त्याचवेळी दुध-औषधे-रुग्णालये या अत्यावश्‍यक सेवा मात्र सुरळीत राहतील. 
  •  रविवारी दुकाने उघडण्याची वेळ सकाळी सहा ते रात्री अकरा ठेवावी. 
  •  सर्वच दुकानांची वेळ रोज सकाळी दहा ते सायंकाळी सहा करावी. 
  • दिवसभर शहरातील सर्वच रस्त्यांवर खाद्यपदार्थ व फेरीवाल्यांना पार्सल सेवा देता येईल. 
  • हॉटेलमधील फक्त जेवण विभाग सुरु ठेवण्यास रात्री आठ ते अकरा अशी मुभा द्यावी. ते सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळणे सक्तीचे असेल. 
  • कंटेनमेंट झोनचे नियम अधिक काटेकोर हवेत. 

लोडिंग अनलोडिंगच्या वेळा वेगवेगळ्या ठरवल्या पाहिजेत

वेळेचे बंधनाची ग्राहकाला सवय लावली पाहिजे. गणपती पेठेत लोडिंग अनलोडिंगच्या वेळा वेगवेगळ्या ठरवल्या पाहिजेत. याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. मार्केट यार्डाकडे प्रशासनाने पुर्ण दुर्लक्ष आहे. आम्ही प्रशासनाने पुढे येऊन अर्थकारण न थांबवता मार्ग काढण्यासाठी एक संयुक्त समिती स्थापन करावी.
- समीर शहा, व्यापारी नेते 

भितीचे वातावरण
व्यापारी पेठांमध्ये होणारी गर्दीचा प्रशासनाने अभ्यास करावा. रुग्ण सापडत असल्याने भितीचे वातावरण आहे. व्यापारी प्रतिनिधींशी संवादाचे धोरण ठेवले पाहिजे.
- बाळासाहेब काकडे, व्यापारी व माजी नगरसेवक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not lockout, need restrictions and self-discipline; They have feelings