ऑनलाईन नको; सांगली महापालिकेची महासभा सभागृहातच व्हावी 

 Not online; The general body meeting of Sangli Municipal Corporation should be held in the hall itself
Not online; The general body meeting of Sangli Municipal Corporation should be held in the hall itself
Updated on

सांगली महापालिकेची महासभा गुरुवारी (ता. 17) पुन्हा ऑनलाईनच घेण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी-विरोधक आणि विरोधक या दोघांनाही थेट सभागृहात महासभा पाहिजे आहे. मात्र आयुक्‍त आणि सत्ताधारी भाजप असा सामना यानिमित्ताने पुन्हा चर्चेत येत आहे. विरोधक असलेल्या कॉंग्रेसनेही ऑनलाईन सभेस विरोध केला आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीने यापूर्वी ऑनलाईन महासभेचा पर्याय उपलब्ध केला गेला. मात्र, सर्व व्यवहार सुरू झाले असताना महासभाच का ऑनलाईन? यामागचे इंगित काय असा संशय व्यक्‍त होत आहे. गेल्या आठ महिन्यांपासून महापालिकेचा कारभार आभासी पद्धतीने सुरू असून त्यामुळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. शहराचा घात करणाऱ्या ऑनलाईन महासभा कोणाच्या हिताच्या? यावर विविध स्तरातून व्यक्‍त झालेला हा संवाद- 

सुरक्षिततेचे नियम पालन गरजेचे 
कोरोना रुग्णांच्या संख्येत सांगली अग्रस्थानी होती. मात्र परिस्थिती सावरल्यानंतर नागरी प्रश्‍नांवर चर्चा थेट सभागृहात चर्चा व्हावी, यासाठी मी व भाजप पक्ष आग्रही आहोत. आम्ही नगरसविकास व विभागीय आयुक्‍तांकडे तशी मागणी केलेली आहे. जनतेच्या प्रश्‍नांना वाचा फोडण्यासाठी महासभा हे व्यासपीठ प्रभावी असल्याने सभा प्रत्यक्ष सभागृहातच व्हावी. सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून सभा झाल्यास रखडलेल्या प्रश्‍नांवर चर्चा होईल. 
- सुधीर गाडगीळ, आमदार, सांगली 

प्रत्यक्ष सभा व्हावी 
कोरोनामुळे ऑनलाईन महासभा घेण्यात येत होती. आता मात्र सर्व व्यवहार पूर्ववत होत आहेत. त्यामुळे कोरोना नियमांचे पालन करून येणारी महासभा प्रत्यक्ष सभागृहात झाली पाहिजे. यासाठी आम्ही आयुक्तांना लेखी पत्र देणार आहोत. ऑनलाईन महासभेत तांत्रिक कारणांमुळे अडचणी निर्माण होतांना दिसताहेत. सर्वच सदस्यांना बोलण्याची संधी मिळायची असेल, तर प्रत्यक्ष सभा झालीच पाहिजे. 
- ऍड. स्वाती शिंदे, नगरसेविका, भाजप 

समस्यांचा बोजवारा रोखता येईल 
प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे. सदस्यांच्या प्रश्‍नांना उत्तरे देताना प्रशासन व सत्ताधाऱ्यांची भंबेरी उडण्याची भीती आहे. त्यामुळे प्रश्‍नांना सामोरे जाण्याऐवजी तांत्रिकबाबींचे भांडवल करून गैरकारभार दडपण्याचा डाव आहे. ऑनलाईन महासभा हा कोरोना काळात उपाय होता, मात्र आज शहरात नागरीसमस्यांचा बोजवारा उडाला असताना प्रशासन दुर्लक्ष करत आहे. सभागृहातच सभा झाली पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही आहे. 
- उत्तम साखळकर, विरोधी पक्षनेते, मनपा 

आयुक्तांना पत्र; आम्हीही अनुकूल 
महासभा ऑफलाईन (प्रत्यक्ष सभागृहात) घेण्याविषयी भाजपकडून विभागीय आयुक्तांना विनंती पत्र पाठविण्यात आले आहे. प्रत्यक्ष सभागृहात सभा घेण्यासाठी भाजप अनुकूल आहे. यामुळे सर्व सदस्यांना सविस्तर चर्चा करता येईल. प्रभागातील समस्या प्रशासनासमोर ठेवल्यानंतर त्यावर योग्य मार्गही निघेल. विरोधकांनी नको त्या गोष्टींचा बाऊ करू नये. 
- शेखर इनामदार, नगरसेवक, भाजप 

संभ्रम दूर व्हावा 
महापालिकेच्या मालकीच्या जागांवरील आरक्षणे उठविण्यासाठी छुप्या पद्धतीने कारभार सुरू असल्याचा संशय आहे. कोट्यवधींची मालमत्ता फुकापासरी जाऊ नये, यासाठी ऑफलाईन महासभा झाली पाहिजे. तसेच कोरोना काळात ऑनलाईन महासभेत घेण्यात आलेले निर्णय व झालेले ठराव जनतेसमोर आल्यास कारभार पारदर्शक आहे किंवा नाही हा संभ्रम दूर होईल. 
- सतीश साखळकर, नागरिक जागृती मंच 

विकास कामांवर चर्चा करा 
प्रभागातील समस्यांचा निपटारा होण्यासाठी नगरसेवक आग्रही असावेत हा संकेत ऑनलाईन सभेमुळे मूर्तस्वरूपात येत नाही. कोरोना काळात शहरात स्वच्छता, ड्रेनेज, कचरा, आरोग्य या विषयांकडे दुर्लक्ष झाले आहे. गुपचूपणे काही भूखंडांचे व्यवहार झाल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे नागरीप्रश्‍न पुन्हा जोमाने सोडविण्यासाठी ऑफलाईन महासभा व्हावी. सभेत केवळ स्टंटबाजी न करता विकास कामांवर चर्चा झाली पाहिजे. 
- अर्चना मुळे, सामाजिक कार्यकर्त्या, सांगली 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com