ऑनलाईन नको; जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा प्रत्यक्षच होऊ द्या : जयंत पाटील यांना साकडे 

अजित झळके
Monday, 12 October 2020

सांगली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेऊ नये, अशी सर्व सदस्यांची भूमिका आहे. प्रत्यक्ष सभा झाल्यास महत्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकेल.

सांगली ः जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेऊ नये, अशी सर्व सदस्यांची भूमिका आहे. प्रत्यक्ष सभा झाल्यास महत्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकेल. त्यासाठी या सभेला मान्यता द्यावी, जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना द्याव्यात, अशी विनंती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी आज पालकमंत्री जयंत पाटील यांना केली. 

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा फेब्रुवारीपासून झाली नाही. ती ऑनलाईन घ्यावी, असे शासनाचे आदेश आहेत. 31 ऑक्‍टोबरपर्यंत लॉकडाऊनचे नियम कायम आहेत. त्यामुळे तोवर प्रत्यक्ष सभेला मान्यता देता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलीय.

सत्ताधारी भाजपसह विरोधातील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे सदस्य प्रत्यक्ष सभेसाठी आग्रही आहेत. ऑनलाईन सभा झाल्यासे बहिष्कार घालू, अशी भूमिका घेतली गेली. अशावेळी अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी पालकमंत्र्यांना साकडे घालून मार्ग काढण्याची विनंती केली. 

त्या म्हणाल्या,""पालकमंत्री जयंत पाटील यांना ऑनलाईन सभेविषयीच्या धोरणात बदलाची विनंती केली. संपूर्ण काळजी घेऊ. प्रत्येक सदस्य सभेला येण्याआधी कोविडची अँटीजेन चाचणी करून घेईल. योग्य अंतर, मास्क, सॅनिटायझरचा वापर हे नियम पाळू. आम्ही सारे जबाबदार लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळे आमच्यावर विश्‍वास ठेवून सभेला मान्यता देण्याची सूचना करावी, अशी विनंती केली.'' 

जीम सुरु करा 

प्राजक्ता कोरे यांनी जिल्ह्यातील व्यायामशाळा, जीम सुरु करण्यास सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे निवेदनही जयंत पाटील यांना दिले. जीमच्या व्यवसायावर अवलंबून अनेकांचे संसार अडचणीत आहेत. व्यायामाअभावी नवी पिढी अस्वस्थ आहे. या साऱ्याचा विचार करावा, असे त्यात म्हटले आहे. 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not online; Let the general meeting of Sangali Zilla Parishad be held in person: Jayant Patil