टायमिंग चुकल्याने वेळ आली खराब... इंदोरीकरांना कीर्तनाची नाही तर कोर्टाची तारीख

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

मराठी कीर्तन व्हीडीओ या युट्यूबच्या चॅनलवर 4 फेब्रुवारी रोजी अपलोड झालेल्या क्लीपमध्ये इंदोरीकर महाराजांनी सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते तसेच टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब होते असे वक्तव्य केले होते.

संगमनेर : अपत्यप्राप्तीबाबत सम-विषम तारखांच्या स्त्री संबंधाचा दाखला जाहीर कीर्तनात देणारे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख यांनाच तारीख पडणार आहे. आजपर्यत कीर्तनाची तारीख बुक असलेल्या महाराजांना आता कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे.

पीसीपीएनडीटीने पाठविली नोटीस

आज दुपारी महाराजांना नगरच्या पीसीपीएनडीटी सल्लागार समितीच्या वतीने, नगरचे जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हा समुचित अधिकारी डॉ. प्रदिप मुरंबीकर यांच्या अध्यक्षतेखालील सल्लागार समितीने लेखी कायदेशीर खुलासा मागवणारी नोटीस बजावली आहे.

टायमिंग चुकला अन वेळ खराब आली

मराठी कीर्तन व्हीडीओ या युट्यूबच्या चॅनलवर 4 फेब्रुवारी रोजी अपलोड झालेल्या क्लीपमध्ये इंदोरीकर महाराजांनी सम तिथीला स्त्रीसंग झाला तर मुलगा आणि विषम तिथीला झाला तर मुलगी होते तसेच टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब होते असे वक्तव्य केले होते. हे वक्तव्य समस्त स्त्रीयांच्या आत्मसन्मानाला धक्का पोचवणारे असून, कायदेशीर व नैतिकदृष्ट्या समाजविघातक आहे.

इंदोरीकर समर्थक उतरले मैदानात

दुसरीकडे इंदोरीकर महाराजांचे पाठीराख्यांनी या वादग्रस्त विधानाचे समर्थन केले आहे. त्या पुष्ट्यर्थ गुरुचरित्राच्या 37 व्या अध्यायातील 51 व्या ओवीचा संदर्भ प्रसारमाध्यमांवर प्रसारित केला आहे. मात्र, देश व देशातील कायदा कोणत्याही धर्मग्रंथावर नाही तर, संविधानावर चालतो असे सांगत, संविधानाच्या कायद्याचा भंग करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या राज्य बुवाबाजी संघर्ष विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

सोमवारी गुन्हा दाखल करणार

निवृत्ती महाराज देशमुख ( इंदोरीकर ) यांच्यावर अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने सोमवारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अंधश्रध्दा समितीच्या राज्य कार्यवाह अँड. रंजना गवांदे यांनी सकाळशी बोलताना दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice from PCPNDT to Indorekar Maharaj