आता तज्ज्ञांची समिती करणार कोल्हापूर-सांगलीच्या महापुराचा अभ्यास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 ऑगस्ट 2019

आपत्ती व्यवस्थापनही कसे केले जावे, याबाबत अनेक उणिवा आणि प्रश्‍न या पुराने निर्माण केले आहेत. लोकांच्या जीविताशी हा खेळ होत असल्याने याबाबत ही समिती गंभीरपणे अभ्यास करेल.

सांगली : पश्‍चिम महाराष्ट्रात पुन्हा महापुरासारखी भयानक परिस्थिती उद्‌भवू नये, यासाठी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना सोबत घेऊन ठोस उपाययोजना करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून तज्ज्ञांच्या सूचना मागवून, प्रत्यक्ष स्थळपाहणी करून उपाययोजना करण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती भाजपचे राज्य सरचिटणीस मकरंद देशपांडे, उद्योजक दीपक शिंदे (म्हैसाळकर) व जिल्हा संघचालक विलासराव चौथाई यांनी दिली. 

देशपांडे म्हणाले, "सातारा, कऱ्हाड, कोल्हापूर, सांगली व आसपासच्या ग्रामीण भागांत, नदीकाठच्या गावांमध्ये महापुराने थैमान घातले. हजारो कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली आहेत. अनेक गोष्टी आता चर्चिल्या जात आहेत. तसेच, आपत्ती व्यवस्थापनही कसे केले जावे, याबाबत अनेक उणिवा आणि प्रश्‍न या पुराने निर्माण केले आहेत. लोकांच्या जीविताशी हा खेळ होत असल्याने याबाबत ही समिती गंभीरपणे अभ्यास करेल.'' 

शिंदे यांनी सांगितले की, यापूर्वीही अनेक वेळा परिसरात नद्यांना पूर आले होते. नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले होते. 2005 चा महापूरही या गावांनी अनुभवला होता. मात्र, आताची आपत्ती त्यापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. याला कारण काय? मागील अनुभव लक्षात घेऊन त्यावर अभ्यास होणे, उपाययोजना आखणे व नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करणे, ही काळाची गरज होती. याकडे दुर्लक्ष केल्यानेच या (2019) महापुरास सामोरे जावे लागले आहे, ही वस्तुस्थिती आहे. 

चौथाई म्हणाले, "महापुराची भयानक परिस्थिती का निर्माण झाली, प्रशासकीय पातळीवर कोणत्या त्रुटी राहिल्या, या नैसर्गिक आपत्तीस जबाबदार घटक कोणते, भविष्यात यासाठी कोणती काळजी घेणे आवश्‍यक आहे, असे अनेक प्रश्न आज आपल्यापुढे आहेत. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पर्यावरणतज्ज्ञ, पाटबंधारे विभागातील व पाणी क्षेत्रातील अभ्यासू व्यक्ती, जलस्रोत, वीज, धरणे, स्वच्छता यासह विविध क्षेत्रांत वर्षानुवर्षे काम केलेल्या अनुभवी व्यक्तींशी संपर्क साधण्यास सुरवात केली आहे. 

सूचना पुढील पत्त्यावर पाठवाव्यात : मकरंद देशपांडे, चाणक्‍य अपार्टमेंट, खाडिलकर गल्ली, ब्राह्मणपुरी, मिरज - 416 410. मोबाईल क्रमांक : 77190 32099 

पूररेषा खुणेचे काम त्वरित करा : म्हैसेकर 
सांगली जिल्ह्यातील पूर ओसरला असून, स्वच्छतेच्या कामाची गती वाढवा, याबरोबरच पुराचे पाणी आलेल्या भागातील पूररेषा खुणेचे काम त्वरित करा, असे आदेश पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी आज दिले. पूरपश्‍चात कामांचा आढावा घेण्यासाठी त्यांनी सांगली जिल्ह्यात विविध ठिकाणांना भेटी दिल्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now a committee of experts will study Kolhapur and Sangli Flood accident