मधुमेह, थायरॉईड तपासणी फक्त एका रुपयात, कुठे?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 May 2020

कोरोनाचा संकट काळात सांगली जिल्ह्यातील मधुमेह आणि थायरॉईड रुग्णांना दिलासा देण्यासाठी येथील मधुमेह तज्ज्ञ डॉ. सुनील कोल्हे यांनी "वनरुपी क्‍लिनिक' हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.

मिरज : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तब्बल दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जागतिक मंदी निर्माण झाली आहे. अशा संकट काळात सांगली जिल्ह्यातील मधुमेह आणि थायरॉईड रुग्णांना दिलासा देण्यासाठी येथील मधुमेह तज्ज्ञ डॉ. सुनील कोल्हे यांनी "वनरुपी क्‍लिनिक' हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत एक जूनपासून केवळ एक रुपयात थायरॉईड आणि मधुमेह तपासणी केली जाणार असल्याची माहिती डॉ. कोल्हे यांनी दिली. 

सध्या कोरोना आजाराने सर्वसामान्य माणसाचे जगणे मुश्‍कील बनविले आहे. बाजार पेठा, कंपन्या, लहान-मोठे उद्योग बंद असल्याने महागाई आणि आर्थिक मंदीचा सामना करावा लागत आहे. सांगली जिल्ह्यात मधुमेह आणि थायराईड रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. मिरजेत तर थायराईडचे असंख्य रुग्ण आहेत. मात्र, सध्या आर्थिक मंदीमुळे त्यांना तपासणी आणि उपचार करण्यास अनेक समस्यांना 

तोंड द्यावे लागत आहे. वैद्यकीय पंढरीत सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी एक रुपयात तपासणी करून मार्गदर्शन केले जाणार आहे. 
डॉ. सुनील कोल्हे म्हणाले,""थायरॉईड आणि मधुमेहाची समस्या जटील आहे. बहुतांशी जणांना मधुमेहाने ग्रासलेले असते. कोरोनामुळे सध्या बाजार पेठांमध्ये आर्थिक मंदी आहे.

गोरगरिबांकडे उपचारासाठी पैसे नाहीत. मात्र, आजार आहे. त्यामुळे केवळ सामाजिक बांधिलकी जोपासून त्यांच्यासाठी सवलतीच्या दरात उपचार पद्धत उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्वसाधारण तपासणी आणि औषधोपचारासाठी सल्ला देण्यासाठी आतापर्यंत दोनशे रुपये आकारणी केली जात होती. मात्र, आता केवळ एक रुपयात तपासणी केली जाणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now diabetes, thyroid test for only one rupee in Miraj