पोलिसांवरील ताण कमी राज्यात आता स्वतंत्र वाहतूक विभाग 

हेमंत पवार
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी निर्णय; दोन हजार 144 पदांची निर्माती.

कऱ्हाड ः वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होऊ लागलेली आहे. सातत्याने "ट्रॅफिक जाम'ला वाहनधारकांना सामोरे जावे लागत आहे. पोलिसांवरही विविध कामांचा ताण आहे. वाहनांचीही संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहतुकीचीही समस्या मोठी निर्माण झालेली आहे. त्याचा विचार करून शासनाच्या गृह विभागाने आता नवीन वाहतूक विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत पोलिस अधीक्षक ते शिपाई अशी दोन हजार 144 पदे निर्माण करण्यात येणार आहेत. लवकरच त्याची कार्यवाही करण्यात येणार असून, त्याद्वारे वाहतुकीला शिस्त लावण्याची कार्यवाही केली जाणार आहे. 

दिवसेंदिवस वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काहींना तर नवीन वाहने घेण्याचा शौकही आहे. वाहनांची संख्या वाढली मात्र, रस्त्यांची रुंदी आहे तेवढीच आहे. ती वाढलेली नाही. त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनधरकांना दररोज "ट्रॅफिक जाम'चा सामना करावा लागत आहे. एकीकडे अशी स्थिती असताना उपलब्ध पोलिसांनाच दररोजचे काम, बंदोबस्त, मंत्र्यांचे दौरे, सण, उत्सव यांसह अन्य कामांचा मोठा ताण सांभाळून वाहतुकीचाही कारभार बघावा लागतो. काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाहतूक शाखेचाही भार दिला जातो. त्यामुळे त्यांच्यावरही कामाचा ताण राहतो. त्यासाठी वाहतूक शाखाच स्वतंत्र करावी, असा प्रस्ताव गृह विभागाने शासनाला सादर केलेला होता.

त्यासंदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल झाली होती. अलीकडे वाहनांचीही संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहतुकीचीही समस्या मोठी निर्माण झाली आहे. त्याचाच विचार करून शासनाच्या गृह विभागाने आता वाहतुकीच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी पहिल्या टप्प्यात नवीन वाहतूक विभागासाठी दोन हजार 144 पदनिर्मिती करण्यासाठी पावले उचलली आहेत. राज्याच्या दृष्टीने हा आकडा तोकडा असला, तरी सुरवात झाल्याने जेथे त्याची कार्यवाही सुरू होईल, तेथील पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्यावरील ताण हलका होण्यास मदत होणार आहे. 
 

तंदुरुस्तीसाठी फायदा 

पोलिसांवर सातत्याने कामाचा ताण असतो. त्यामुळे त्यांना आवश्‍यक तेवढी विश्रांती मिळत नाही. त्यामुळे अनेक अधिकारी, कर्मचारी यांना मधुमेह, रक्तदाब यांसह अन्य आजार झाले आहेत. वाहतूक शाखा नव्याने कार्यरत झाल्यावर ती जेथे सुरू होईल तेथील अधिकारी व कर्मचारी यांच्यावरील कामाचा अतिरिक्त ताण कमी होऊन अतिरिक्त कामाचा बोजाही कमी होण्याबरोबर त्यांना शारीरिक तंदुरुस्तीसाठी त्याचा फायदा होणार आहे. 
 

तीन पोलिस अधीक्षक, सहा उपअधीक्षक 

राज्यात नव्याने होणाऱ्या वाहतूक विभागासाठी तीन पोलिस अधीक्षक, सहा पोलिस उपअधीक्षक, 27 पोलिस निरीक्षक, 63 सहायक पोलिस निरीक्षक, 108 पोलिस उपनिरीक्षक, 126 सहायक पोलिस उपनिरीक्षक, 379 हवालदार, 1143 शिपाई आणि 289 चालक अशी दोन हजार 144 पदे निर्माण करण्यात आली असून, त्याला शासनाने मंजुरी दिली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the Independent Traffic Department in the state