आता 50 टक्के सवलतीत किसान रेल्वेतून जाणार शेती माल 

शंकर भोसले  
Thursday, 29 October 2020

रेल्वे बोर्डाकडून मालवाहतुकीसाठी शेतकऱ्यांसह, उद्योग आणि व्यवसायिकांचा माल 50 टक्के सवलतीमध्ये मालवाहू करण्याची मुभा देण्यात आली आहे.

मिरज : रेल्वे बोर्डाकडून मालवाहतुकीसाठी शेतकऱ्यांसह, उद्योग आणि व्यवसायिकांचा माल 50 टक्के सवलतीमध्ये मालवाहू करण्याची मुभा देण्यात आली आहे. ही प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. तर यासाठी ऑनलाईन नोंदणी गरजेची आहे. खाजगी वाहतुकीपेक्षा अत्यंत अल्प खर्चामध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल आणि उद्योगासह अन्य वस्तूंची पाठवण दिल्ली दरबारी होणार आहे. तसेच सांगलीतून सर्वाधिक पिकणारी हळदही निर्यात होणार आहे. यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांची हळद व्यापाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. 

दर रविवार सकाळी दहा वाजता ही किसान रेल्वे मिरजेतून कुर्डूवाडी मार्गे धावत आहे. आधी पुर्ण भाडे आकारून सेवा देणारी ही गाडी आता यापुढे मात्र 50 टक्के सबसीडीच्या तत्वावर सुटेल. यामुळे सांगली, मिरजसह सोलापूर येथील पंढरपूर, सांगोला, कुर्डूवाडी येथील शेतकरी आणि उद्योग व्यवसायिकांना याचा फायदा होणार आहे. 

संपुर्ण सुरक्षा आणि अल्प दरात माल वाहतुक होत असल्याने सर्व व्यवसायिकांना आपला माल राज्याबाहेर ही पाठवता येणार आहे. दर रविवारी मिरज येथून दुपारी एक वाजून दहा मिनीटांनी रवाना होणार आहे. यासाठी रेल्वेच्या पार्सल विभागाकडे साहित्यांची नोंदणी करणे गरजेचे आहे. 

हळद वाहतुकीसाठी व्यापाऱ्यांशी चर्चा... 
सांगली जिल्ह्यात द्राक्ष शेतीनंतर हळद शेती मोठ्या प्रमाणात होत असते. यामुळे सांगलीची हळद दिल्ली दरबारी रेल्वेने कमी खर्चात जाणार आहे. यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यापारी वर्गाशी चर्चा सुरू आहे. सध्या मिरज स्थानकातून शिमला मिरर्ची, कांदा, बटाट यासह फळ भाज्यांची वाहतुकीस मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. 

रेल्वेच्या संकेतस्थळावर नोंदणी... 
खाजगी वाहतुकी पेक्षा 50 टक्के सवलत घेऊन अल्पदरात माल पाठविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. यासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेत स्थळावर नोंदणी करणे आवश्‍यक आहे. या प्रक्रियेनंतर शेतमाल हा 50 टक्के सवलतीमध्ये पाठवला जाणार आहे. 

या राज्यातून जाणार किसान रेल्वे 
कर्नाटकातील म्हैसुर जंक्‍शन, हसन जंक्‍शन, अरसिकेरी जंक्‍शन, हुबळी, बेळगाव, लोंढा तर महाराष्ट्रातील मिरज जंक्‍शन, सांगोला, कुर्डूवाडी, दौंड, मनमाड, भुसावळ मध्यप्रदेशातील इटारसी, भुपाल, झासी, आग्रा, मथुरा दिल्लीतील हजरत निजामुद्दीन या स्थानकातून जाते.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now, Kisan Railway at 50 per cent discount