आता...कुठं कसं जायाचं हनिमूनला ? नवदांपत्याची हूरहूर कायम 

honeymoon.jpg
honeymoon.jpg

सांगली-  ना लोणावळा, ना खंडाळा, ना पन्हाळा, बेंगलोर, गोवा आणि काश्‍मिर तर लांबच, हनिमून साजरा करायचा कुठे असा प्रश्‍न नवदांपत्यासमोर उभा आहे. टाळेबंदीत अनंत अडचणींचा सामना करत लग्न एकदा पार पडले, पण भेटीची आस लागलेल्या अनेक नवविवाहितांनी मनाला मुरड घालत हनिमून लांबणीवर टाकल्याचे चित्र आहे. कधी एकदा टाळेबंदी उठते आणि कधी एकदा लॉंग टूर साठी जातोय, याची प्रतिक्षा उभयतांना लागून राहिली आहे. 

कोरोनामुळे गेल्या तीन महिन्यांपासून सगळे व्यवहार ठप्प होते. लग्न, मुंज, साखरपुडा, वर-वधू पाहणी यासह अन्य कार्यक्रमाला बंदी असल्याने मार्च, एप्रिल, मे महिन्यात शुभकार्ये झालीच नाहीत. लग्नाचा ऐन हंगाम वाया गेल्याने विवाहेच्छुकांना काळजी लागून राहिली. 

पै पाहुणे, मित्रमंडळी, दूरचे नातेवाईक यांना सुट्या असल्याने अनेकांनी सोयीचे मुहूर्त पाहून लग्नाची तारीख निश्‍चित केली होती. मात्र टाळेबंदीमुळे या सर्व नियोजनावर पाणी फिरले. जिल्हा तसेच राज्याच्या सीमा बंद असल्याने माणसांची आवक जावक पूर्णत: थांबल्याचे चित्र होते. साखरपुडा होउन लग्नाच्या प्रतिक्षेत असलेल्यांची तर पुरती निराशा झाली होती. अनेकांनी प्री वेडिंग, वेडिंग त्यानंतर हनिमून असे टूर पॅकेज भलीमोठी रक्‍कम देउन बुक केले होते.

लग्न ठरणे हे एक दिव्य असताना टाळेबंदीत काहीजणांनी वधूची ऑनलाईन पसंती करुन साखरपुडाही मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत उरकला. प्रशासनाने विवाह सोहळ्यासाठी 50 लोकांना परवानगी दिल्याने भलेमोठे समारंभ करण्यावर मर्यादा आल्या. मात्र ठरलेले लग्न किती दिवस पुढे ढकलायचे, या प्रश्‍नाचा गुंता प्रशासनाच्या या निर्णयाने सुटला. ठरलेल्या कार्यालयात किंवा हॉलमध्ये छोटेखानी लग्नेही लागली. मात्र त्यानंतर ज्याची प्रतिक्षा व उत्सुकता असते, त्या हनिमूनला मुहूर्त मिळण्यात टाळेबंदीमुळे खोडा बसत आहे. एखादे पर्यटन स्थळ, प्रेक्षणीय स्थळ, धार्मिक ठिकाणी हनिमूनला सर्वाधिक पसंती असते.

लोणावळा, महाबळेश्‍वर, पाचगणी, गोवा, म्हैसूर, उटी, काश्‍मिर ही पसंती असणारी स्थळे टाळेबंदीमुळे लॉक आहेत. धार्मिक स्थळांना गेल्या अडीच तीन महिन्यांपासून कुलूप लागले आहे. त्यामुळे नवविवाहित जोडप्यांना ना थंड हवेचे ठिकाण, ना प्रेक्षणीय स्थळ, ना पर्यटन. हनिमून साजरा करण्यासाठी योजलेले हटके फंडे टाळेबंदीने फेल गेल्याने नवदांपत्य नाराज आहेत. कोरोना विषाणू संसर्गामुळे विवाहबध्द झालेल्यांच्या नशिबी मनात रंगवलेला हनिमून साजरा करण्याचा योगच नसल्याचे चित्र आहे. 

फार्म हाउस ठरतेय डेस्टिनेशन 
सांगलीतील एका प्रथितयश धनाढ्य व्यापाऱ्याच्या मुलाचा जानेवारीत साखरपुडा थाटामाटात झाला होता. एका भव्य मंगल कार्यालयात मे महिन्यात शाही थाटात बार उडवण्याचे नियोजन होते. मात्र मे महिन्यात टाळेबंदी सुरुच राहिल्याने तो मुहूर्त पुढे ढकलला. लॉकडाउन वाढतच राहिल्याने अखेर मोजक्‍या नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ उरकण्यात आला. परदेशात हनिमून साजरा करण्याचे नियोजन केलेल्या नवविवाहित दांपत्याने अखेर शहरानजीक अलिशान फार्म हाउस जवळ केले. हनिमून साजरा करण्यासाठी फार्म हाउस हेच डेस्टिनेशन ठरवले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com