ग्रामसेवक आले नाहीत... करा फोन!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

ग्रामसेवक गावात आलेच नाहीत, कधीतरी येतात, सहा महिने गायब असतात. विचारले तर सांगतात, बीडीओंकडे बैठक आहे... आता लोकांना त्याची शहानिशा करता येईल. फोन उचला आणि विचारा तुमच्या बीडीओंना, खरच ग्रामसेवकांची बैठक आहे का?

सांगली : ग्रामसेवक गावात आलेच नाहीत, कधीतरी येतात, सहा महिने गायब असतात. विचारले तर सांगतात, बीडीओंकडे बैठक आहे... आता लोकांना त्याची शहानिशा करता येईल. फोन उचला आणि विचारा तुमच्या बीडीओंना, खरच ग्रामसेवकांची बैठक आहे का? ही सोय आता जिल्हा परिषदेने उपलब्ध करून द्यायचे ठरवले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती यंत्रणेशी निगडित 65 अधिकाऱ्यांचे मोबाईल क्रमांक गावागावांत झळकणार आहेत.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी 65 प्रिपेट कार्डची खरेदीही झाली आहे. येत्या आठवडाभरात प्रत्येक अधिकाऱ्याकडे त्यांच्या पदाचा "परमनंट मोबाईल क्रमांक' असेल. अधिकारी बदलले तरी पुढील अधिकाऱ्याकडे तो नंबर राहील. तो ग्रामपंचाय, पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा या ठिकाणी प्रसिद्ध केला जाईल.

लोक आपल्या कामाच्या संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधू शकतील. अर्थात, त्यासाठीही टप्पे ठरवून देण्यात आले आहेत. लोकांनी थेट सीईओंचा क्रमांक उपलब्ध आहे म्हणून दररोज त्यांना फोन करावा, असे अपेक्षित नाही. कामाचा वेळ, वेग आणि त्याची जबाबदारी समजून घेऊन तक्रारी कराव्यात, अशी अपेक्षा असणार आहे. 

श्री. गुडेवार म्हणाले,""हा प्रयोग मी याआधी केला आहे, त्यात थोडी सुधारणा करून येथे राबवतो आहे. तो परिणामकारक ठरेल, असा विश्‍वास वाटतो. सरकारी कर्मचारी हा लोकांच्या सेवेसाठी आहे. त्याने काम केलेच पाहिजे. तो करणार नसेल तर त्याची तक्रार करण्याची सोय लोकांना माहिती हवी. त्याची दखल आम्ही घेऊ.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of 65 officers will be increased in the villages in Sangali District