कडेगाव तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 88 वर

संतोष कणसे 
Sunday, 9 August 2020

कडेगाव : तालुक्‍यातील नेवरी, येतगाव, खेराडे विटा, वांगी येथे आज कोरोनाचे सहा नवे रुग्ण आढळले आहेत.

कडेगाव : तालुक्‍यातील नेवरी, येतगाव, खेराडे विटा, वांगी येथे आज कोरोनाचे सहा नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला असून, तालुक्‍यात आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 88 वर पोचली आहे; तर वाढत्या रुग्णांमुळे कडेगाव तालुका अक्षरशः हादरला आहे. 

तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असतानाच आज पुन्हा तालुक्‍यात एकूण सहा रुग्ण सापडल्याने तालुका हादरला आहे. नेवरी येथे हैदराबाद येथून आलेल्या 49 व 20 वर्षीय व्यक्तीसह 23 वर्षीय महिला, तर खेराडे विटा येथे मुंबईहून आलेले 51 वर्षीय व्यक्ती, येतगाव येथील 39 वर्षीय व्यक्ती, तर वांगी येथील 43 वर्षीय वाहक असे तालुक्‍यातील एकूण सहा व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आज एकाच दिवसात सहा जणांना कोरोना झाल्याने तालुक्‍यात मोठी खळबळ उडाली आहे. 

तालुक्‍यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत; तर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. तालुक्‍यातील नेवरी, येतगाव, खेराडे विटा, वांगी या गावांमध्ये औषधांच्या रोगप्रतिबंधक फवारणीसह युद्धपातळीवर वेगवेगळे उपाय योजले जात आहेत. प्रशासनाने या गावातील आढळून आलेल्या रुग्णांच्या ठिकाणचा परिसर कंटेंन्मेंट झोन म्हणून घोषित केले आहे. या चारही ठिकाणांचे सर्व रस्ते सीलबंद करण्यात आले. 

या गावात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोग्य विभागाने कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग सुरू केले असून, आज पॉझिटिव्ह आलेल्या सहा रुग्णांना आरोग्य विभागाने होम आयसोलेशनमध्येच उपचार सुरू केले आहेत. 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of coronary patients in Kadegaon taluka is 88