महापालिकेच्या प्राथमिक शाळांचा पट यंदा 521 ने वाढला 

विष्णू मोहिते 
Monday, 31 August 2020

महापालिकेच्या प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या नवनवीन उपाययोजनांमुळे 2020-21 च्या सत्रात पट 521 ने वाढला आहे.

सांगली : महापालिकेच्या प्राथमिक शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या नवनवीन उपाययोजनांमुळे 2020-21 च्या सत्रात पट 521 ने वाढला आहे. तसेच महापालिकेच्या 18 शाळेमध्ये सेमी इंग्लिश वर्ग सुरु करण्यात आल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. 

महापालिका शिक्षण विभागाच्या एकूण 50 शाळा आहेत. त्यामध्ये 5390 विद्यार्थी शिक्षण घेत असून जुलै अखेर मागील वर्षाच्या पटामध्ये 521 विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा असलेला कल लक्षात घेवून यंदाच्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीपासून सेमी इंग्लिशचे वर्ग सुरु केले आहेत. 18 शाळेमध्ये हे वर्ग सुरु केले असून 418 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन डिजीटल क्‍लासरुमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची तयारी करणेत येत आहे. कोव्हिडच्या काळात पालकांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश सुविधा उपलब्ध करुन दिलेले आहे. 

विद्यार्थ्यांना नाविन्यपुर्ण व आधुनिक शैक्षणिक सुविधा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिका शाळा नं. 23 ही मॉडेल स्कूल तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यासाठी स्मार्ट टिव्ही व टॅब, प्रोजेक्‍टरच्या माध्यमातून शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे. खेळाचे साहित्य, संगीत वर्ग व भिंतींवर चित्रे चितारुन त्यांना बोलके केले आहे. शाळा क्र. 19 व 11 (मिरज), 7 व 17 (सांगली) या शाळांमध्ये वरील सुविधा उपलब्ध करुन शिक्षणासाठी सुसज्ज केल्या आहेत. 

राज्य शासनाच्या शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये गेल्या चार वर्षात विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत सातत्याने चमकत आहेत. यंदा विद्यार्थ्याची तयारी करुन घेण्यासाठी शिष्यवृत्तीचे वर्ग ऑनलाईनव्दारे नियमित सुरु आहे. उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी हणमंत बिराजदार महापालिकेच्या शाळांचा दर्जा वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of municipal primary schools has increased by 521