Vidhansabha 2019 : बहुतांश लोकप्रतिनिधी युतीच्या कळपात? 

Congress_and_BJP_Logo.jpg
Congress_and_BJP_Logo.jpg

सोलापूर जिल्ह्यातील अडचणीतील बहुतांश लोकप्रतिनिधी युतीच्या कळपात जाण्यास इच्छुक असल्याचे चित्र आहे. सध्यातरी त्यांची भूमिका संदिग्धच असल्याने नेमके चित्र स्पष्ट होत नसल्याने, कार्यकर्त्यांची कोंडी होत आहे. युतीमध्ये मतदारसंघ कोणाला सुटेल, यावर पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे. परंतु "आमचं ठरलंय...' असे जाणवत आहे. 

साखर कारखानदारी, पतसंस्था, सहकारी संस्थांच्या माध्यमातून राजकारण करीत असताना अडचणीत आलेल्यांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात मिळण्याच्या अपेक्षेबरोबरच अप्रिय कारवाईतून सुटकेच्या आशेने पक्षांतराचा राजकीय खेळ सुरू असल्याचे दिसते. पक्ष बदलण्याच्या चर्चेमध्ये सध्यातरी सिद्धाराम म्हेत्रे (अक्कलकोट), भारत भालके (पंढरपूर-मंगळवेढा), बबन शिंदे (माढा), दिलीप सोपल (बार्शी) या आमदारांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीवेळी वंचित बहुजन आघाडीकडून संस्थापक ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक लढवून तब्बल एक लाख 70 हजारांवर मते मिळविली. त्यामुळे जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात वंचितचा प्रभाव निश्‍चितपणे जाणवणार असे वाटते. 

दुधनी (ता. अक्कलकोट) नगरपालिकेवर सलग साठ वर्षे वर्चस्व असलेल्या ज्येष्ठ नेते सातलिंगप्पा म्हेत्रे यांची हयात काँग्रेसमध्ये गेली. बहुतांशवेळा नगराध्यक्षपदही ते स्वतः किंवा त्यांच्या कुटुंबात होते. त्यांचे पुत्र काँग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे भाजपमध्ये जाण्यासंदर्भात कार्यकर्त्यांची चाचपणी करीत आहेत. विधान परिषद, जिल्हा परिषद, सोलापूर बाजार समिती आदींच्या निवडणुकीप्रसंगी म्हेत्रे यांनी भाजपची सोबत केली. त्यांच्या भूमिकेमुळे आणि दोन मंत्र्यांच्या बेदिलीतून अक्कलकोट भाजपमध्ये मोठे वादळ उठले आहे. 

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या शहर उत्तरमधून "हॅटट्रिक' साधलेले पालकमंत्री विजय देशमुख भाजपकडून चौथ्यांदा निवडणूक लढवतील. सोलापूर दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची उमेदवारी राहील. काँग्रेसकडे सक्षम उमेदवाराची उणीव जाणवते. सध्या तळ्यात-मळ्यात असलेल्या दिलीप माने यांनी गेल्या वेळी निवडणूक लढविली होती. युती धर्माप्रमाणे ही जागा शिवसेनेची आहे. युतीनंतरच येथील चित्र स्पष्ट होईल. शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे गेल्या निवडणुकीत निसटत्या मतांनी विजयी झाल्या. या वेळी युती झाली तर त्यांच्यासमोरील अडचण मोठी राहील. 

करमाळ्यात गेल्या वेळी शिवसेनेतर्फे आमदार नारायण पाटील यांचा निसटत्या मतांनी विजय झाला. यंदा मात्र त्यांची ताकद वाढली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी 'राष्ट्रवादी'कडून लोकसभा निवडणूक लढविली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून रश्‍मी बागल यांची उमेदवारी निश्‍चित समजली जाते. परंतु शिंदे पुन्हा इच्छुकांच्या यादीत आहेत. माढ्यातून आमदार बबन शिंदे सलग पाच वेळा निवडून आलेत. त्यांचा सामना पारंपरिक विरोधक शिवसेनेचे शिवाजी सावंत यांच्याशी झाला. त्यांचे थोरले बंधू तानाजी सावंत सध्या जलसंधारण मंत्री आहेत. 

मतदारसंघातील बदलत्या चित्रामुळे शिंदे यांची भूमिका स्पष्ट होत नाही. त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदेही निवडणूक लढवतील, असा अंदाज आहे. मोहिते-पाटील भाजपमध्ये गेल्याने त्यांच्या कुटुंबीयातील एक व्यक्ती येथून निवडणूक लढवेल, अशी चर्चा आहे. मोहिते-पाटील यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे माळशिरसमधील (राखीव) वातावरणच बदलले आहे. येथील आमदार हणमंतराव डोळस (राष्ट्रवादी काँग्रेस) यांचे निधन झाले आहे. भाजपची स्थिती मजबूत आहे. 

सांगोला मतदारसंघातून तब्बल अर्धशतकावर झेंडा रोवलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी निवडणुकीच्या रिंगणातून निवृत्ती जाहीर केली असली, तरी शेकापला त्यांचा उत्तराधिकारी शोधण्यात मोठी अडचण होणार आहे. गणपतरावांच्या निवृत्तीमुळे सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुकांकडून इमले रचले जात आहेत. बार्शीतून दिलीप सोपल यांची भूमिका ठरल्यानंतर विरोधकांची भूमिका स्पष्ट होईल. 

मोहोळ (राखीव) मतदारसंघात सर्वच पक्षांची कसोटी आहे. 'राष्ट्रवादी'चे आमदार रमेश कदम जेलची हवा खात आहेत. येथे स्थानिक उमेदवाराची वानवाच असते. लोकसभा निवडणुकीत मोहोळ व पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांनी मोदी लाटेतही आघाडीचे सुशीलकुमार शिंदे यांच्या पारड्यात वजन टाकले आहे. त्यामुळे राज्यात युतीचे घोडे आघाडीवर असले तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून या दोन्ही मतदारसंघांतून उमेदवारीसाठी दिग्गजांचे प्रयत्न सुरू आहेत. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके (काँग्रेस) यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांना पायघड्या घालताना दुसरीकडे आपल्याला पक्षात या, अशी हाक भाजपचे नेते देत असल्याचे ते जाहीरपणे सांगू लागले आहेत. 

युती झाली तर... 
2014 च्या विधानसभा निवडणुका युती आणि आघाडीतर्फे स्वतंत्रपणे लढल्या गेल्या. तेव्हा जिल्ह्यातील 11 पैकी राष्ट्रवादी काँग्रेस चार, काँग्रेस तीन, भाजप दोन आणि शेकाप व शिवसेनेचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील गणिते पाहता जिल्ह्यात युतीचे बळ वाढले आहे. अशातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गळती लागली आहे. शिवसेना-भाजप युती झाली तर सध्याचे चित्र पूर्णपणे बदलण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com