सांगलीकरांना दिलासा; चाचण्या आणि रूग्णसंख्याही होतेय कमी 

घनश्‍याम नवाथे
Monday, 28 September 2020

कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी सुरू असलेल्या आरटीपीसीआर आणि ऍन्टीजन चाचण्यांची संख्या गेल्या आठवड्यात कमी झाली आहे. तसेच दुसरीकडे कोरोना बाधित रूग्णसंख्याही कमी होऊ लागली आहे.

सांगली : कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी सुरू असलेल्या आरटीपीसीआर आणि ऍन्टीजन चाचण्यांची संख्या गेल्या आठवड्यात कमी झाली आहे. तसेच दुसरीकडे कोरोना बाधित रूग्णसंख्याही कमी होऊ लागली आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. आठवड्यातील रूग्णसंख्या सहाशे ते आठशेच्या पटीत आल्याचे दिसून येते.

कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी सुरवातीला आरटीपीसीआर चाचणी केली जात होती. त्यासाठी नाकातून व घशातून स्वॅब घेतला जातो. त्याचा अहवाल 24 ते 48 तासात येतो. अचूक व खात्रीशीर निदानासाठी ही चाचणी उपयोगी आहे. परंतू या चाचण्यांना वेळ लागत असल्यामुळे त्याच्याबरोबरीने ऍन्टीजेन चाचण्यांद्वारे कोरोना निदान करण्यास प्रारंभ झाला. त्यासाठी नाकातून स्वॅब घेतला जातो. अर्ध्या तासात या चाचणीतून निदान समजते. लवकर निदान व्हावे तसेच बाधित रूग्णांचे विलगीकरण सोपे जावे यासाठी या चाचण्यांची संख्या वाढवली गेली. परंतू या चाचण्यांच्या निदानाबाबत आजही अनेकांच्या मनात संभ्रम आहे. 

जिल्ह्यात रूग्णसंख्या वाढत असताना आणि चाचण्यांचे अहवाल प्रलंबित राहत असल्यामुळे खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचण्या करण्यास परवानगी दिली गेली. चाचणी केंद्र वाढवल्यामुळे दररोज तीन ते साडे तीन हजार चाचण्या होऊ लागल्या. तर दुसरीकडे जुलै व ऑगस्ट महिन्यात रूग्ण संख्या वाढल्याचेही चित्र दिसून आले. जिल्ह्यात आठवड्यापूर्वीपर्यंत आरटीपीसीआर आणि ऍन्टीजेन या दोन्ही चाचण्यांची संख्या 3 हजारहून अधिक होती. तर रूग्णसंख्या देखील आठशे ते हजारच्या पटीत निष्पन्न झाली. 

परंतू आठवड्यापासून आरटीपीसीआर आणि ऍन्टीजेन या दोन्ही चाचण्यांची संख्या पाचशे ते सहाशेच्या पटीत कमी झाली आहे. त्याचबरोबर रूग्णसंख्या देखील आठशे ते हजार ऐवजी सहाशे ते आठशेच्या पटीत निष्पन्न झाली आहे. सध्यातरी रूग्ण संख्या कमी होऊ लागल्यामुळे तसेच कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्यामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र कोरोना बाधित रूग्णांची संख्या खरोखरच कमी होत आहे काय? हे स्पष्ट होण्यासाठी आणखी काही दिवसाचा कालावधी लागेल. 

दिनांक........आरटीपीआर/ऍन्टीजेन चाचणी............जिल्ह्यातील बाधित 
15/9-----------2616-----------------------749 
16/9-----------3316---------------------- 865 
17/9-----------3130----------------------1028 
18/9-----------3098----------------------1010 
19/9-----------2603-----------------------830 
20/9-----------2335-----------------------811 
21/9-----------2417-----------------------690 
22/9-----------2481-----------------------697 
23/9-----------2928-----------------------821 
24/9-----------2691-----------------------685 
25/9-----------2795-----------------------607 
26/9-----------2542-----------------------615 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of tests and patients is also decreasing

Tags
टॉपिकस
Topic Tags: