esakal | चाचण्यांची संख्या घटली; रूग्णसंख्याही कमी : सांगलीतील चित्र
sakal

बोलून बातमी शोधा

The number of tests decreased in Sangali; The number of patients is also low

सांगलीत कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी सुरू असलेल्या आरटीपीसीआर आणि ऍन्टीजन चाचण्यांची संख्या गेल्या पाच-सहा दिवसात कमी झाली आहे.

चाचण्यांची संख्या घटली; रूग्णसंख्याही कमी : सांगलीतील चित्र

sakal_logo
By
घनशाम नवाथे

सांगली : कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी सुरू असलेल्या आरटीपीसीआर आणि ऍन्टीजन चाचण्यांची संख्या गेल्या पाच-सहा दिवसात कमी झाली आहे. तसेच दुसरीकडे कोरोना बाधित रूग्णसंख्याही कमी होऊ लागली आहे. पाच-सहा दिवसातील रूग्णसंख्या सहाशे ते आठशेच्या पटीत असल्याचे दिसून आले. 

कोरोना संसर्गाचे निदान करण्यासाठी सुरवातीला आरटीपीसीआर चाचणी केली जात होती. त्यासाठी नाकातून व घशातून स्वॅब घेतला जातो. त्याचा अहवाल 24 ते 48 तासात येतो. अचूक व खात्रीशीर निदानासाठी ही चाचणी उपयोगी आहे. परंतू या चाचण्यांना वेळ लागत असल्यामुळे त्याच्याबरोबरीने ऍन्टीजेन चाचण्यांद्वारे कोरोना निदान करण्यास प्रारंभ झाला. त्यासाठी नाकातून स्वॅब घेतला जातो. अर्ध्या तासात या चाचणीतून निदान समजते. लवकर निदान व्हावे तसेच बाधित रूग्णांचे विलगीकरण सोपे जावे यासाठी या चाचण्यांची संख्या वाढवली गेली. परंतू या चाचण्यांच्या निदानाबाबत आजही अनेकांच्या मनात संभ्रम आहे. 

जिल्ह्यात रूग्णसंख्या वाढत असताना आणि चाचण्यांचे अहवाल प्रलंबित राहत असल्यामुळे खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचण्या करण्यास परवानगी दिली गेली. चाचणी केंद्र वाढवल्यामुळे दररोज तीन ते साडे तीन हजार चाचण्या होऊ लागल्या. तर दुसरीकडे जुलै व ऑगस्ट महिन्यात रूग्ण संख्या वाढल्याचेही चित्र दिसून आले. जिल्ह्यात आठवड्यापूर्वीपर्यंत आरटीपीसीआर आणि ऍन्टीजेन या दोन्ही चाचण्यांची संख्या 3 हजारहून अधिक होती. तर रूग्णसंख्या देखील आठशे ते हजारच्या पटीत निष्पन्न झाली. 

पाच-सहा दिवसापासून आरटीपीसीआर आणि ऍन्टीजेन या दोन्ही चाचण्यांची संख्या पाचशे ते सहाशेच्या पटीत कमी झाली आहे. त्याचबरोबर रूग्णसंख्या देखील आठशे ते हजार ऐवजी सहाशे ते आठशेच्या पटीत निष्पन्न झाली आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे रूग्णसंख्या वाढली तर चाचण्यांची संख्या कमी झाल्यामुळे रूग्णसंख्या कमी झाली असाही निष्कर्ष काहीजण काढत आहेत. मात्र कोरोना रूग्णसंख्या खरोखरच कमी होत आहे काय? याचे निदान करण्यासाठी आणखी काही दिवसाचा कालावधी लागेल.

संपादन : युवराज यादव

loading image
go to top