पोषण आहार अन्न शिजले नाही, पण अनुदान दिले

अजित झळके 
Thursday, 4 February 2021

कोरोना संकटाने रोजगार हिरावून घेतला. अनेकांच्या चुली विझल्या. जगणे मुश्‍किल झाले. या काळात शाळा बंद होत्या. मुलेच शाळेत नाहीत तर मग पोषण आहार शिजवण्याचा प्रश्‍नच नव्हता. त्यामुळे साडेचार हजार महिलांच्या चुलीही विझल्या असत्या.

सांगली : कोरोना संकटाने रोजगार हिरावून घेतला. अनेकांच्या चुली विझल्या. जगणे मुश्‍किल झाले. या काळात शाळा बंद होत्या. मुलेच शाळेत नाहीत तर मग पोषण आहार शिजवण्याचा प्रश्‍नच नव्हता. त्यामुळे साडेचार हजार महिलांच्या चुलीही विझल्या असत्या. मात्र राज्य शासनाने काम बंद म्हणून मानधन बंद ही भूमिका न घेता त्यांच्या चुली पेटतील, अशी व्यवस्था केली. या महिलांना अन्न शिजवण्याचे अनुदान दिले. अन्न शिजले नाही, मात्र त्यांची चूलही विझली नाही. दरमहा सुमारे 68 लाख रुपयांचे अनुदान या महिलांना दिले गेले. 

जिल्ह्यात सुमारे साडेसतराशे शाळा आहेत. जिथे 25 पेक्षा जास्त पट आहे. त्या ठिकाणी एक तर त्याहून अधिक पट असलेल्या शाळांत विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात दोन ते चार महिलांची नेमणूक करण्यात आली आहे. पोषण आहार शिजवण्याचा ठेका बचत गटांना देण्यात आला आहे. त्यातून 4 हजार 475 महिलांना रोजगार मिळाला. भात, भाजी आणि अन्य पोषण आहार बनवून मुलांना देणे ही त्यांची जबाबदारी. ते कामच थांबले.

15 मार्चनंतर शाळा बंद झाल्या. दहा महिने त्या बंद राहिल्या. या काळात शासनाकडून तांदूळ, डाळी, मटकी आली. ती विद्यार्थ्यांना वाटली गेली. जर अन्नच शिजणार नसेल तर आमचे मानधन कसे मिळणार, असे कोडे या महिलांना पडले होते. परंतू, शासनाने त्यांची चूल विझू दिली नाही. या काळातील नियमानुसार मानधन सुरु ठेवले. प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये मानधन मिळाले. 

आता ऑक्‍टोबर 2020 पर्यंतचे मानधन मिळाले आहे. नोव्हेंबरची बिले तयार आहेत. पुढील बिलेही पाठवण्याची सूचना आहे. जेणेकरून या आर्थिक वर्षातील फेब्रुवारीपर्यंतची बिले वेळेत काढली जातील. वर्षातील 12 पैकी 10 महिन्यांचे मानधन दिले जाते. दोन महिने सुटीचे मोजले जातात. या दहा महिन्यांचे मानधन सुमारे सात कोटी होते. ही रक्कम प्रचंड आहे. हाताला काम नसताना दिलेला हा आधार आहे, अशी भावना महिलांनी व्यक्त केली आहे. त्या उत्साहाने तांदूळ व डाळी वाटप करत आहेत. आता शाळा सुरु झाल्यात. मात्र पोषण आहार शिजवण्यास मनाई आहे. तो लवकरच शिजवून देण्याची परवानगी मिळाली तर दुप्पट उत्साहाने काम करू, असे महिला सांगतात. 

शासनाने बचत गटातील महिलांना पोषण आहाराच्या मानधनाची पूर्ण रक्कम देण्याचे ठरवले आणि वाटप सुरु आहे. त्यांना हा आधार आहे. ऑक्‍टोबरपर्यंतची बिले दिलीत. उर्वरीतही दिली जातील. महिन्याकाठी 68 लाखाचे अनुदान वितरीत होते. 
- एम. एम. मुल्ला, लेखाधिकारी, पोषण आहार

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nutritious diet food is not cooked, but subsidized