
सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहर व तालुक्यातील प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस अलर्ट झाले आहे.
विटा : सांगली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहर व तालुक्यातील प्रशासन, आरोग्य विभाग, पोलीस अलर्ट झाले आहे. आज सकाळी तहसीलदार ऋषिकेत शेळके, पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह पालिका प्रशासन व आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी व्यवसाय बंद ठेवावेत यासाठी रस्त्यावर उतरून आवाहन केले. थोड्याच वेळात उद्योजक प्रताप सुतार व व्यापारी संघटनातील पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली व्यापारी, व्यावसायिकही रस्त्यावर उतरून "लॉकडाऊन रद्द करा' अशा घोषणा देत तहसील कार्यालयावर मोर्चाने आले.
मंगळवारपासून व्यापारी, व्यावसायिकांना आवाहन करून अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व व्यवसाय बंद ठेवायला भाग पाडले जात आहे. अचानक बदलामुळे व्यावसायिक भांबावलेत. आज सकाळी व्यापारी रस्त्यावर आले. घोषणा देत तहसील गाठले. व्यापाऱ्यांनी संतप्त भावना व्यक्त करत "आम्ही सर्व अटी, नियम, सूचनांची अंमलबजावणी करतो. ठरावीक वेळ देऊन व्यवसाय सुरू ठेवण्यास परवानगी द्या. 48 तासांत निर्णय घ्या, असे निवेदन तहसीलदार ऋषिकेश शेळकेंकडे देण्यात आले.
उद्योजक प्रताप सुतार, कापड असोसिएशनचे अध्यक्ष दयाराम आहूजा, संजय भस्मे, सराफ असोसिएशनचे माजी अध्यक्ष भरत मुळीक, अध्यक्ष राजेंद्र शितोळे, दीपक साळुंखे, शरद देवकर, प्रसाद दिवटे, सदाशिव निकम, विजय नागदेव, गोपाळ भस्मे, अजय बठेजा, आहुजा व विविध व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
संपादन : प्रफुल्ल सुतार
सांगली