वरुणराजा मेहेरनजर; कडेगाव तालुक्‍यात ओढे-नाले हाऊसफुल्ल 

रविंद्र मोहिते  
Tuesday, 29 September 2020

वांगी (ता. कडेगांव) परिसरांवर यंदा वरुणराजा चांगलाच मेहेरनजर असून वरचेवर बरसणाऱ्या पावसाने जमिनीतील पाणीपातळी चांगलीच सुधारली आहे.

वांगी : वांगी (ता. कडेगांव) परिसरांवर यंदा वरुणराजा चांगलाच मेहेरनजर असून वरचेवर बरसणाऱ्या पावसाने जमिनीतील पाणीपातळी चांगलीच सुधारली आहे. परिसरांतील सर्व ओढे-नाले हाऊसफुल्ल आहेत. परीणामी पाण्यासाठी ताकारी योजना लवकर सुरु करण्याची वेळ येणार नाही असे चित्र आहे. 

कायम दुष्काळाचा सामना करीत असलेल्या इथल्या शेतीला सुमारे 15 वर्षापूर्वीपासून ताकारी उपसा योजनेचे पाणी मिळू लागल्याने शेती उद्योगाने कात टाकली. कृष्णाकाठाला लाजवेल अशी शेती ताकारीच्या पाण्यामुळे बहरली आहे. तरीही पर्जन्यराजा घाटमाथ्यावर नेहमी रुसलेलाच असतो. काही वेळा खरीप पिके जगविण्यासाठी ताकारीचे पाणी सोडावे लागले होते. दोन वर्षांपासून मात्र पाऊस वांगी परिसरावर चांगलाच फिदा असून सतत मोठा पाऊस कोसळत आहे. खरीपाची भट्टी चांगलीच जमली आहे. हंगामाच्या सुरवातीला थोडे दिवस ओढ दिल्यानंतर हा पाऊस पिकांच्या गरजेनुसार कोसळत आहे. 

येरळा आणि नांदणी नद्या दुथडी वाहत आहेत. जमीनीतील पाणीपातळी सुधारली असून सर्व विहीरी तुडूंब भरल्या आहेत. सदरचे पाणी रब्बी हंगामासाठी चांगलेच पूरक ठरेल असे शेतकरी बोलत आहेत. पावासामुळे ऊसांची वाढ चांगली झाली आहे. सखल शेतात वारंवार पाणी साचल्याने वापसा येणे मुश्‍किल झाले आहे. सर्वच पिकांसाठी पोषक हवामान आणि पिकांना वाढीसाठी आवश्‍यकतेनुसार पडणारा पाऊस यामुळे सर्व पिके यावर्षी जोमात आहेत. कृत्रिम पाण्यापेक्षा नैसर्गिक पाणी चांगले असते त्यामूळे यंदा उर्वरित हंगामातील पिकेही चांगले उत्पन्न देतील असा विश्वास शेतकरीवर्गाला आहे. एकंदरीत यावर्षी बळीराजा पावसावर खूष आहे. 

कितीतरी वर्षातून यावर्षी वांगी भागात भरपूर पाऊस पडत आहे. रब्बीसाठी आवश्‍यक पाणीसाठा जमीनीत झाला आहे. आणखी पाऊस पडणार आहे. तशी नक्षत्रे शिल्लक आहेत. दरवर्षी असा पाऊस पडला तर ताकारी योजनेवरील बराचसा ताण निश्‍चित कमी होईल. 
- दिलीपराव सुर्यवंशी, प्रगतीशिल शेतकरी, वांगी 

ताकारी लाभक्षेत्रात यावर्षी वरचेवर दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अजून महिनाभर तरी पाण्याची चणचण भासणार नाही. हि समाधानाची बाब आहे. तरीही शेतक-यांना आवश्‍यक असेल तेव्हा ताकारी योजना सुरु करण्याची आमची तयारी आहे. कसलीही अडचण नाही....... 
- प्रकाश पाटील, कार्यकारी अभियंता, ताकारी जलसिंचन योजना. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ode-nala housefull in Kadegaon taluka