येडियुराप्पा सरकारला धक्का ; मंत्री रमेश जारकीहोळी व्हिडीओ व्हायरल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 March 2021

मंत्री रमेश जारकीहोळी यांची आक्षेपार्ह चित्रफीत वृत्तवाहिनीवर
राजकीय वर्तुळात खळबळ; येडियुराप्पा सरकारला धक्का

बंगळूर : बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदामंत्री रमेश जरकीहोळी यांची आक्षेपार्ह चित्रफीत आज, मंगळवारी (ता. २) येथे प्रसारित करण्यात आली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. ही चित्रफीत वृत्त वाहिन्यांवर प्रसारित झाल्याने आता मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पाही अडचणीत आले आहेत.

एका युवतीला सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून मंत्री रमेश जारकीहोळी यांनी तिला जाळ्यात अडकविले व तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप नागरी होराट समितीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लहोळ्ळी यांनी येथे केला. त्यांनी बंगळूर पोलिस आयुक्तांकडे यासंबंधात तक्रार दाखल केली आहे. युवतीला कर्नाटक वीज प्रसारण मंडळात (केपीटीसीएल) नोकरी देण्याचे आमिष दाखवून जारकीहोळी यांनी तिची फसवणूक केल्याचा आरोपही कल्लहोळ्ळी यांनी तक्रार अर्जात केला आहे. दिल्लीतील कर्नाटक भवनमध्ये त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगून सरकारी विश्रामधामाचा (आयबी) त्यांनी दुरुपयोगही केल्याचे म्हटले आहे. चित्रफीत जाहीर न करण्यासाठी तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला.

युवतीच्या कुटुंबातील सदस्यांनी आपल्याशी संपर्क साधून त्यांनीच चित्रफीत देऊन युवतीला आणि आम्हाला न्याय मिळवून देण्याची मागणी केल्याचे ते म्हणाले.रमेश जारकीहोळी यांच्याविरुद्ध त्यांनी बंगळूर आयुक्तांकडे तक्रार दाखल केले असून प्रकरण कब्बन पार्क पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहे. जारकीहोळी यांची आक्षेपार्ह चित्रफीत विविध वृत्त वाहिन्यावरून प्रदर्शित होताच राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.

जारकीहोळी ‘नॉट रिचेबल’
जारकीहोळी यांच्याशी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा मोबाईल ‘नॉट रिचेबल’ आढळून आला. चित्रफीत प्रसारित होण्याआधी जारकीहोळी सरकारी कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हैसूरला गेले होते. त्यानंतर चामुंडेश्वरी टेकडीवर जाऊन त्यांनी देवीचे दर्शन घेतले. चित्रफीत प्रदर्शित झाल्याचे वृत्त समजताच ते अज्ञातस्थळी रवाना झाल्याचे समजते.

जारकीहोळी यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केली होती. भाजपमध्ये मंत्रिपदाचे आमिष दाखवून त्यांनी काँग्रेस व धजदमधील १७ आमदार फोडून भाजपमध्ये   घेऊन गेले होते. आमदारपदाचा राजीनामा देऊन ते सर्वजण भाजपत सामील झाले. परिणामी राज्यातील काँग्रेस-धजद युती सरकार अल्पमतात आल्याने तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना राजीनामा द्यावा लागला.

मुख्यमंत्री राजीनामा मागणार?
जारकीहोळी यांच्या रासलीला प्रकरणामुळे येडियुराप्पा सरकारची बदनामी झाल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनी या संबंधात भाजप हायकमांडशी संपर्क साधल्याचे समजते. हायकमांड त्यांचा राजीनामा घेण्याचा मुख्यमंत्र्यांना सल्ला देणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. उद्या (ता. ३) दुपारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलविली आहे. या बैठकीला रमेश जारकीहोळी उपस्थित रहाण्याबाबत साशंकता वर्तविण्यात येत आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा करून मुख्यमंत्री जारकीहोळी यांचा राजीनामा मागण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली.

‘त्या’ चित्रफितीशी आणि माझा काहीच संबंध नाही. त्या चित्रफितीची चौकशी व्हावी. त्यात मी दोषी आढळलो, तर मंत्रिपदाचाच काय, तर आमदारकीचाही राजीनामा देईन. मी दोषी असलो तर फाशीची शिक्षाही भोगायला तयार आहे. मी गेली २१ वर्षे आमदार आहे; पण कोणाच्या विरोधात असा प्रकार केला नाही. विरोधकांशी थेट दोन हात केले आहेत.
- रमेश जारकिहोळी, जलसंपदा मंत्री

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Offensive video of Minister Ramesh Jarkiholi on news channel belgaum crime marathi news